आतंकवादी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची बनवून त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता ! – जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद

स्थानिक नागरिक आतंकवाद्यांना साहाय्य करत असण्याचीही शक्यता !

जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस्.पी. वैद

नवी देहली – वर्ष २०१६-१७ मध्ये ज्या प्रमाणे जिहादी आतंकवादी सूची बनवून पोलिसांना ठार मारत होते, त्याचप्रमाणे आता त्यांनी हिंदु सरकारी कर्मचार्‍यांची सूची त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे. आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये सरकारी कर्मचार्‍यांचे नाव, पत्ता, त्यांच्या कार्यालयाचा पत्ता, पद आदी सर्व नमूद असू शकतात. आतंकवाद्यांना स्थानिक लोक साहाय्यही करत असणार. आतंकवादी या स्थानिकांचा बुद्धीभेद करून स्वतःच्या कामासाठी वापर करत असतात, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस संचालक एस्.पी. वैद यांनी दिली. काश्मीरमध्ये हिंदूंना वेचून ठार मारण्यात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

हताश पाकिस्तानने पुन्हा षड्यंत्र रचले !

एस्.पी. वैद म्हणाले की, हत्यासत्रांमुळे काश्मीरमधील हिंदू आणि बाहेरून आलेले कामगार यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अन् ते त्यांच्या मूळ राज्यात परतत आहेत. आतंकवाद्यांचाही या हत्यांमागे हाच हेतू होता की, ते काश्मीरमधून परत जावेत. अशा आक्रमणांमागे हताश झालेला पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. यांचा हात आहे. राज्यातील कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवाद न्यून झाल्याने पाक हताश झाला होता. त्यामुळेच तो सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. तरीही आपले पोलीस आणि सैन्य आतंकवाद्यांचा सामना करण्यास सक्षम आहेत. ज्या लोकांवर जिहादी आतंकवादी आक्रमण करू शकतात, अशांची त्यांनी बनवलेली सूची शोधण्याची आवश्यकता आहे. त्या सूचीतील लोकांना सुरक्षित स्थळी नेता येईल, तसेच आतंकवाद्यांना शोधून  त्यांना ठार मारण्याच्या अभियानाला आणखी गती दिली पाहिजे.