शहापूर (बेळगाव) येथील श्री गणेश आणि श्री मारुति मंदिरे खुली करण्यासाठी ‘रस्ता बंद’ आंदोलन !

बेळगाव, २ जून (वार्ता.) – खडेबाजार शहापूर येथील गौड ब्राह्मण समाजाची प्राचीन श्री गणेश आणि श्री मारुति मंदिर, अशी दोन मंदिरे उघडण्यासाठी नुकतेच रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक भाविक उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या ३ वर्षांपासून ही मंदिरे बंद आहेत. (गेल्या ३ वर्षांपासून मंदिरे हिंदु भाविकांसाठी बंद असणे योग्य नाही. या प्रकरणी हिंदूंचे धर्माचार्य, भाविक, तसेच सर्व संबंधितांनी लक्ष देऊन त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. मंदिरे बंद असल्याने भाविक मंदिराच्या चैतन्यापासून वंचित आहेत ! – संपादक)

या संदर्भात ‘गौड सारस्वत ब्राह्मण मारुति मंदिर विश्वस्त समिती’चे माजी अध्यक्ष दिलीप तिळवे म्हणाले, ‘‘ही दोन्ही मंदिरे ५०० वर्षांहून अधिक जुनी आहेत. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ‘विश्वस्त समिती’ची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक ३ वर्षांनी ‘ट्रस्ट’ची निवड होते; मात्र वर्ष २०१६ पासून एकही बैठक झालेली नाहीत. ही मंदिरे गेल्या ३ वर्षांपासून बंद असून विश्वस्त मंडळातील ११ पैकी ७ सदस्यांनी त्यागपत्रे दिले आहेत. त्यामुळेच मंदिरे घडण्यासाठी हे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.’’