रामभक्त युवक आणि ग्रामस्थ संतप्त
सातारा, ३१ मे (वार्ता.) – राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र चाफळ येथे समर्थ स्थापित श्रीराम मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असून चाफळ ग्रामपंचायतीच्या महसूलामध्ये याचा मोलाचा वाटा आहे; मात्र याच सुप्रसिद्ध मंदिराच्या दारात अगदी १०० मीटर अंतरावर गावातीलच एका व्यावसायिकाने मांसाहारी खाद्यपदार्थाचे (चायनीज सेंटर) दुकान उघडले आहे. यामध्ये ‘नॉनव्हेज चायनीज, मासळी, बिर्याणी’ आदी मांसाहारी पदार्थ विकले जात आहेत. यामुळे गावातील रामभक्त युवक आणि ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त केला आहे. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने अशी कृती करणाऱ्यांना थांबवणेच आवश्यक ! – संपादक)
श्रीक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिराला शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून पर्यटक येथे श्रीरामरायांच्या दर्शनासाठी येतात, तसेच समर्थस्थापित ११ मारुतींपैकी २ मारुति (दासमारुति आणि वीरमारुति) याच ठिकाणी आहेत. असे असूनही येथे चायनीज सेंटर उघडण्यात आले आहे. याविषयी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि रामभक्त ग्रामस्थ यांनी मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे; मात्र याला मंदिर व्यवस्थापानकडून प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता त्यांनीही याविषयी काही करण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती !श्रीक्षेत्र चाफळ हे देवस्थान पाटण तालुक्यात असून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून श्रीक्षेत्र चाफळ येथील राममंदिर मांस आणि मद्य मुक्त करावे, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि रामभक्त ग्रामस्थ यांनी केली आहे. |