व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूच्या ब्रिटेनच्या दाव्याचे रशियाकडून खंडण

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूचे वृत्त ही अफवा आहे. पुतिन यांना कोणताही आजार झालेला नाही, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह यांनी पुतिन यांचा मृत्यू झाल्याच्या ब्रिटेनने केलेल्या दाव्याचे खंडण केले. लाव्हरोव्ह यांनी फ्रान्समधील वृत्तवाहिनी ‘टीएफ् वन’शी बोलतांना ही माहिती दिली. ‘पुतिन प्रतिदिन दूरचित्रवाहिनीवर दिसतात. तुम्ही त्यांना पाहू शकता, त्यांचे बोलणे ऐकू शकता !’, याकडेही लाव्हरोव्ह यांनी लक्ष वेधल्याचे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुतिन यांना कर्करोग झाला असून, काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर पोटातील पाणी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया झाली होती, असे वृत्त माध्यमांत प्रसारित झाले होते. यासह ‘पुतिन यांचा मृत्यू झाला असून सध्या दिसणारे पुतिन ही तोतया व्यक्ती आहे,’ असा दावा ब्रिटिश गुप्तहेरांनी केला होता. दुसरीकडे पुतिन यांची दृष्टी जात आहे. ते आणखी ३ वर्षे जिवंत राहू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा एका रशियन गुप्तहेराने केल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द इंडिपेंडंट’ने दिले आहे. त्याचेही रशियाने खंडण केले.