राष्ट्रहिताला प्राधान्य देत सर्बियाकडून रशियासमवेत नैसर्गिक वायूसंबंधी नवा करार !

व्लादिमिर पुतिन आणि ॲलेक्झँडर व्युसिक

बेलग्रेड (सर्बिया) – सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्झँडर व्युसिक यांनी रशियासमवेत ३ वर्षांचा नैसर्गिक वायूसंबंधी करार केल्याचे घोषित केले आहे. त्यांची याविषयी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये वायू कराराखेरीज अन्यही विषयांवर व्यापारासंबंधी विचार करण्यात आल्याचे व्युसिक यांनी सांगितले.

सर्बिया-रशिया यांच्यातील सध्याचा १० वर्षांचा वायू करार ३१ मे या दिवशी समाप्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवा करार करण्यात आला आहे. व्युसिक म्हणाले की, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाला आरंभ होऊन ९० दिवस झाले आहेत. सर्बिया हा युरोपातील एकमेव देश आहे, ज्याने स्वत:च्या स्वतंत्र धोरणालाच प्राधान्य दिले आहे. हे धोरण रशियाधार्जिणेही नाही आणि पाश्चात्य देशांच्या धोरणावरही अवलंबून नाही. सर्बिया छोटासा देश असून तो स्वत:च्या जनतेच्या हिताला अधिक प्राधान्य देतो, असेही व्युसिक म्हणाले.