नवी देहली – देशात १ जूनपासून इतर मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि खासगी चारचाकी वाहनांचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ (विमा) महागणार आहे. ‘भारतीय विमा’ आणि ‘नियामक आणि विकास प्राधिकरण’ यांनी वाहनांच्या विम्याचा दर वाढवण्याचा मसुदा सिद्ध केला आहे. ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ हे प्रत्येक वाहनासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक असून ते चालकाने स्वत:समवेत ठेवणे बंधनकारक असते.
‘मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्स’ म्हणजे काय ?
‘थर्ड पार्टी’ म्हणजे तिसरा पक्ष. पहिला पक्ष वाहन मालक असतो, दुसरा वाहन चालक असतो आणि अपघात झाल्यास बळी पडणारा तिसरा पक्ष असतो. सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाच्या वापराच्या वेळी वाहनामुळे अपघात झाल्यास आणि तिसऱ्या पक्षाची जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्यास, वाहनाचा मालक आणि त्याचा चालक अशा हानीची भरपाई करण्यास कायदेशीररित्या बांधील आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक हानी भरपाईसाठी विमा आस्थापने ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ करतात.