रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश

बांगलादेशातील शरणार्थी तळावर चांगली सुविधा मिळत असल्याने घुसखोरी !

ढाका (बांगलादेश) – भारतातून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशात घुसखोरी करत असल्यावरून बांगलादेश सरकारने भारताकडे चिंता व्यक्त करत ती रोखण्यास सांगितले आहे. या संदर्भात बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले आहे. बांगलादेशचे म्हणणे आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशमध्ये घुसखोरी करत आहेत.

१. काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी म्हटले होते की, भारतातून बांगलादेशात घुसखोरी करणारे रोहिंग्या मुसलमान वर्ष २०१२ मध्ये भारतात घुसले होते. भारतातून मोठ्या संख्येने रोहिंग्या मुसलमान आमच्या देशात येत आहेत. त्यासाठी ते दलालांचे साहाय्य घेत आहेत. ज्या रोहिंग्यांनी बांगलादेशात घुसखोरी केली, त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, बांगलादेशच्या कॉक्स बाजार येथील रोहिंग्यांना शरणार्थी तळावर चांगल्या सुविधा आणि भोजन मिळत आहे. त्यामुळे ते येथे येत आहेत.

२. भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी १६ सहस्र रोहिंग्या शरणार्थी आहेत. ही संख्या अधिकही असू शकते, असे म्हटले जाते. बांगलादेशात ११ लाख रोहिंग्या आहेत.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !
  • बांगलादेशाने भारताला सांगण्यापेक्षा त्याच्या धर्मबांधवांना धर्माच्या आधारे स्वीकारावे आणि त्यांचे पोषण करावे !