तामिळनाडू पोलिसांकडून ५०० वर्षे प्राचीन मूर्ती हस्तगत

५०० वर्षे प्राचीन शिवाची मूर्ती

चेन्नई – पोनामल्ले शहराच्या जवळ पोलिसांच्या ‘मूर्ती विभागाने’ हिरव्या दगडातून बनवलेली ५०० वर्षे प्राचीन मूर्ती हस्तगत केली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली भक्तवाचलम् आणि बकीयाराज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशोधकांच्या मते पंचमुख असलेली शिवाची ही एकमेवाद्वितीय मूर्ती आहे. ही मूर्ती नेपाळमधील मंदिरातील असल्याचा कयास आहे.

काहीजण एक प्राचीन मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. पुरातन वस्तूंचे संग्राहक असल्याचे भासवून पोलिसांनी संशयित विक्रेत्यांशी सलगी साधली आणि मूर्तीच्या खरेदीची रक्कम ठरवून मूर्ती दाखवण्याचे निमित्त केले. या सापळ्यात मूर्ती तस्कर अडकले. या मूर्तीची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यामागे आणखी काहीजण असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तमिळनाडू पोलिसांच्या ‘मूर्ती विभागाने’ आतापर्यंत राज्यातील तस्करांकडून अनेक पुरातन मूर्ती हस्तगत केल्या आहेत. तामिळनाडूमधून विदेशात विक्री केलेल्या पुरातन मूर्ती परत आणून तामिळनाडू पोलिसांनी त्या येथील मंदिरांमध्ये पुन्हा स्थापित केल्या आहेत. (असे पोलीस सर्वत्र हवेत ! – संपादक)