संभाजीनगर येथे प्रेमास नकार देणार्‍या तरुणीची हत्या !

सी.सी.टी.व्ही. फूटेज मधील दृश्य

संभाजीनगर – येथील शरणसिंग सेठी (वय २० वर्षे) याने एकतर्फी प्रेमातून सुखप्रीतसिंग कौर उपाख्य कशिश (वय १८ वर्षे) या सुशिक्षित कुटुंबातील तरुणीची अत्यंत निर्दयीपणे क्रूर हत्या केली. ही घटना २१ मे या दिवशी दुपारी १.३० वाजता शहरातील मोकळ्या प्लॉटवर घडली. या घटनेनंतर आरोपी शरणसिंग पसार झाला आहे. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

वर्षभरापासून आरोपी शरणसिंग हा सातत्याने तिचा पाठलाग करत होता. सुखप्रीतसिंगसह तिच्या कुटुंबाने त्याची वारंवार समजूत घातली. त्यानंतर २ मासांपूर्वी त्याने पाठलाग न करण्याचे आश्वासनही दिले; मात्र ते पाळले नाही. धार्मिक शस्त्र कृपाणने सुखप्रीतसिंग हिच्या गळ्यावर एकापाठोपाठ १४ आणि पोटात ३ वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून घाबरलेली तिची मैत्रीण दिव्या हिने आरडाओरड केली; मात्र हे पहात असणारे विद्यार्थी आणि तरुण साहाय्यासाठी आले नाहीत. कुणीही त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. (मृतवत आणि असंवेदनशील समाज ! – संपादक) काही जणांनी साहाय्य करून तिला रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

स्वार्थासाठी टोकाचे आणि हिंसक पाऊल उचलण्यास धजावणारी आजची तरुणाई ! असे होऊ नये, यासाठी मुलांवर लहानपणापासूनच योग्य संस्कार करणे आवश्यक आहे !