दैवी दौऱ्यातील साधकांची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करवून घेणाऱ्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणतात, ‘‘तुमच्या प्रत्येक कृतीला कर्म जोडलेले असते. एखादी सेवा करायला तुम्ही हात उचलला की, तुमचे कर्म आणि अकर्म यांची मोजणी चालू होते.’’ एखादी आई त्याच्या मुलाला त्याचे भवितव्य चांगले होण्यासाठी काळ-वेळ यांचा विचार न करता शिकवते, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला गुरुरूपात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ शिकवत आहेत आणि मला साधनेच्या पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्यासाठी त्या प्रयत्न करवून घेत आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. ‘गजरा लांब असल्याने मध्येच तोडल्यामुळे त्यातील गुलाबाची फुले नीट दिसत नसल्याची चूक सांगून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्वरित लक्षात आणून देणे आणि ‘सेवेमध्ये भावासहित बुद्धीचा वापर कसा करायचा ?’, हे शिकायला मिळणे

श्री. वाल्मिक भुकन

‘आम्ही महर्षींच्या आज्ञेने तमिळनाडू राज्यातील ‘येरकाडू’ येथील एका मंदिरात गेलो होतो. मंदिरात जातांना मी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी मोगऱ्याचा गजरा घेतला. त्यामध्ये गुलाबाची फुले होती. गजरा लांब असल्यामुळे मी तो मध्यभागी तोडला आणि तो त्यांना घालायला दिला. त्यांनी तो हातात घेतल्यावर मला सांगितले, ‘‘गजरा अर्धा केल्यामुळे मध्यभागी जे गुलाबाचे फूल होते, ते बाजूला झाले आहे. त्यामुळे केसांत गजरा घातल्यानंतर त्यातील एक फूल दिसेल आणि एक फूल अंबाड्याच्या मागे लपले जाईल. त्याच वेळी त्यांनी ‘पुढच्या वेळी कसे असायला हवे ?’, हेही मला सांगितले. त्यामुळे कुठलीही सेवा करतांना ‘त्याचे बारकावे लक्षात ठेवून सेवा कशी करायला हवी ? आणि अशा सेवेमध्ये भावासहित बुद्धीचा वापर कसा करायचा ?’, हे मला शिकायला मिळाले.

२. ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी प्लास्टिकच्या वेष्टनात ठेवलेल्या गोळ्या कशा पद्धतीने त्यांतून काढाव्यात, हे सांगितल्यामुळे ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकता येणे

एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना वेगवेगळी औषधे आणि गोळ्या दिल्या होत्या. त्यांना दिलेल्या गोळ्यांच्या पाकिटातील प्लास्टिकच्या वेष्टनातील कोणती गोळी कोणत्या क्रमाने घ्यायची, हेही त्या मला सांगायच्या. त्या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘पहिली गोळी घेतांना त्या गोळीचे नाव आणि त्याचा कालबाह्य होण्याचा दिनांक (Expiry date) तसाच रहायला हवा. त्यामुळे सर्व गोळ्या संपल्या नाहीत, तरी शेवटपर्यंत गोळीचे नाव आणि गोळीचा कालबाह्य होण्याचा दिनांक कुणालाही कळू शकेल. यातून मला ‘परिपूर्ण कृती कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. त्यामुळे मला गुरूंविषयी कृतज्ञता वाटत होती. ‘भगवंताजवळ घेऊन जाण्यासाठी गुरु आपल्याला सेवेतील बारकावे कसे शिकवत असतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई, तमिळनाडू. (१२.३.२०२२)