हेरवाड (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीप्रमाणे विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा !

राज्य सरकारचे आवाहन

मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे ‘विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी घ्यावा’, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. हा ठराव घेण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. याविषयी राज्य सरकारने १८ मे या दिवशी एक परिपत्रक काढले आहे.

त्यात म्हटले आहे की,

१. हेरवाड ग्रामपंचायतीने केलेली ही कृती स्तुत्य आहे.

२. विज्ञानवादी आणि प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असतांना विधवा प्रथेचे समाजात पालन केले जाते. अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची आवश्यकता होती. या गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने ही प्रथा बंद करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

३. विधवा महिलांना प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी, तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.

४. विधवा प्रथेच्या निर्मूलनासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचित करावे.

विधवा प्रथा बंद म्हणजे नेमके काय ?

पतीच्या निधनाच्या वेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जाते. (विधवा झाल्यावर करावयाच्या कृतींमागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे. – संपादक) या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ दिले जात नाही.