ज्ञानवापीच्या प्रकरणी आज पुढील सुनावणी होणार

अधिवक्त्यांच्या संपामुळे १७ मे या दिवशी सुनावणी झाली रहित !

ज्ञानवापी मशिद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात येथील दिवाणी न्यायालयात हिंदु पक्षाकडून प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर १७ मे या दिवशी होणारी सुनावणी अधिवक्त्यांंच्या संपामुळे होऊ शकली नाही. यामुळे आता उद्या, १८ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. राज्याच्या विशेष सचिवांनी केलेल्या एका आक्षेपार्ह विधानामुळे अप्रसन्न झालेल्या अधिवक्त्यांनी संप पुकारला होता. तरीही हिंदु पक्षाकडून बनारस बार असोसिएशनला पत्र लिहून ‘ज्ञानवापीचे प्रकरण महत्त्वाचे असल्याने याच्या संबंधित अधिवक्त्यांना कार्यामध्ये सहभागी होण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली होती; मात्र ती मान्य न झाल्याने सुनावणी होऊ शकली नाही.

आज पुढील सूत्रांवर होणार सुनावणी !

१. ज्ञानवापी मशिदीतील वजू खाना (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) स्थानांतरित करणे

२. नंदीच्या मूर्तीसमोर असलेली भिंत पाडणे

३. वजू खान्याच्या ठिकाणी सापडलेल्या शिवलिंगाचे मोजमाप करणे

४. वजू खाना बंद (सील) करण्यात आल्याने मुसलमानांसाठी पर्यायी व्यवस्था करणे

५. येथील शौचालयांनाही सील करण्यात आल्याने पर्यायी व्यवस्था करणे

६. वजू खान्याच्या पाण्यात असलेल्या माशांना ते सील करण्यात आल्याने खाद्य मिळणे कठीण असल्याने त्यांना अन्यत्र हालवणे

७. ज्ञानवापीच्या पश्‍चिमेकडील भिंत पाडून तेथील मंडपाचे, तसेच येथे असणारा ढिगारा हटवून तेथेही चित्रीकरण करणे