अमरनाथ यात्रेकरूंना मिळणार ५ लाख रुपयांचा ‘विमा कवच’ !

नवी देहली – केंद्रशासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार अमरनाथ यात्रेसाठी जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे ‘विमा कवच’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक यात्रेकरूला ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ म्हणजेच ‘आर्.एफ्.आय.डी.’ टॅग दिला जाणार आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा प्रथमच यात्रेकरूंना हे टॅग दिले जाणार आहेत. यासमवेतच तंबू, ‘वायफाय हॉटस्पॉट’, पुरेशी प्रकाशव्यवस्था यांसारख्या आवश्यक सोयीही यात्रेकरूंच्या संपूर्ण मार्गात करून देण्यात येणार आहेत.

१. अमरनाथ यात्रेमध्ये जिहादी आतंकवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे स्पष्ट केले आहे.

२. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल २ वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला अनुमती मिळाल्यामुळे यावेळी सुरक्षेसमवेतच इतर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

३. याआधी ५ ऑगस्ट २०१९ या दिवशी अमरनाथ यात्रा झाली होती. त्यानंतर आता २ वर्षांनंतर म्हणजेच ३० जून २०२२ पासून यात्रेला आरंभ होत आहे.

‘आर्.एफ्.आय.डी.’ टॅग म्हणजे काय ?

‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन’ म्हणजेच ‘आर्.एफ्.आय.डी.’ टॅग हे तंत्रज्ञान ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’वर आधारित असून ती एखादी वस्तू अथवा व्यक्ती यांना शोधण्यात, ओळखण्यात अथवा संपर्क प्रस्थापित करण्यात वापरली जाते.