मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी पावसाची शक्यता !

  • मान्सून अंदमानात दाखल !

  • ८ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ !

मुंबई – यंदा मान्सून १६ मे या दिवशी अंदमानच्या समुद्रात आला आहे. तो केरळमध्ये २७ मेपर्यंत पोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान सिद्ध होत आहे. या राज्यांमध्ये अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्येही ढगाळ वातावरण आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ (वादळी पावसाची चेतावणी) लागू केला आहे.

दक्षिण-मध्य कर्नाटकावरील चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील ५ दिवस तमिळनाडू, कर्नाटक किनारपट्टी, केरळ आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य भारतातील काही भागांत उष्ण लाटांचीही शक्यता आहे.

मुंबईमध्ये २२ दिवस मुसळधार पाऊस होणार !

मुंबई – जून ते सप्टेंबर या कालावधीतील २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची शक्यता आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

पावसाळा तोंडावर आल्याने मुंबईमध्ये नालेसफाईची कामे जोरदार चालू आहेत. शहरामध्ये पाणी तुंबू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र अनेक ठिकाणी कामे वेळेत पूर्ण न झाल्याने पाणी साचते. त्याचे खापर नालेसफाईवर फोडले जाते. या व्यक्तिरिक्त समुद्राला भरती आल्यास आणि त्याच कालावधीमध्ये पुष्कळ पाऊस पडल्यास मुंबई शहरामध्ये पाणी साचून रहाते. या वर्षी जून-जुलैमध्ये प्रत्येकी ६ दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये प्रत्येकी ५ दिवस मोठी भरती असणार आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आले आहे. भूस्खलनाची क्षेत्रे म्हणून ७२ ठिकाणे घोषित करण्यात आली असून त्यापैकी ४५ क्षेत्रे धोकादायक म्हणून चिन्हांकीत करण्यात आली आहेत. या भागात रहाणाऱ्या लोकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या नोटिसा पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.