‘अन्नपूर्णाकक्षात प्रसाद बनवण्यासाठीचा पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ‘अग्नि’ ! अग्निदेवाप्रती कृतज्ञताभाव कसा असला पाहिजे, याविषयी आपण आधीच्या लेखांद्वारे पाहिले. आज मी अन्नपूर्णा कक्षातीलच महत्त्वपूर्ण घटक असणाऱ्या प्रसाद (स्वयंपाक) बनवण्यासाठी उपयोगात आणणाऱ्या भांड्यांविषयीचे विवेचन या लेखाद्वारे करणार आहे.
(भाग ६)
१. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ ठेवणे आवश्यक !
सर्वप्रथम तुम्ही ज्या भांड्यात नित्याचा स्वयंपाक शिजवता, ते भांडे लखलखीत स्वच्छ असावे. मी अनेक घरांमध्ये पाहिले आहे की, स्वयंपाक करण्याच्या भांड्यांचा खालचा भाग पुष्कळ अस्वच्छ असतो. अशा भांड्यांतील पदार्थ देवता कधीही नैवेद्य म्हणून ग्रहण करणार नाहीत. त्यामुळे ती भांडी चांगल्या प्रकारे स्वच्छ करायला हवीत. घरातील स्वयंपाकाचे भांडे पुष्कळ जुनाट झालेले, तुटलेले असते, त्यावर अनेक डाग पडलेले असतात, म्हणजेच ते भांडे कधी कधी इतके अस्वच्छ असते की, त्याकडे एकदा पाहूनही तुमची जेवणाची इच्छाच नष्ट होईल. याला कारणीभूत घरातील लोकांचा आळस असतो. घरकाम करणाऱ्या बाईकडे नीट लक्ष न दिल्यामुळे ती घाईगडबडीत कसेबसे काम उरकून निघून जाते.
२. स्वयंपाक करणार असलेल्या भांड्यांमध्ये कधीही काही खाऊ अथवा जेवू नये !
स्वयंपाक करणाऱ्या भांड्यांत, विशेषतः जे भांडे आपण शेगडीवर ठेवतो, त्यात कधीही कोणताही पदार्थ खाऊ नये. त्यामुळे ते भांडे अशुद्ध होते. ते अग्निदेवाकडून आवश्यक असे सूक्ष्म अग्नितत्त्व ग्रहण करू शकत नाही. जर आम्ही कधीही अन्न शिजवण्याच्या भांड्यात एखादा पदार्थ घेऊन खाऊ लागलो, तर आई किंवा आजी आम्हाला त्वरित त्याची जाणीव करून देत असे. तसे करण्यापासून आम्हाला परावृत्त केले जात असे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३१.१.२०२२)