मशिदीच्या सर्वेक्षणावर स्थगिती आणण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण

नवी देहली – वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाने १२ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी दिला. ज्ञानवापी मशिदीचे टाळे उघडण्याचीही अनुमती देण्यात आली. दिवाणी न्यायालयाच्या या आदेशावर स्थगिती आणण्यासाठी वाराणसी येथील ‘अंजुमन ए इंतेजामिया मशिदी’च्या व्यवस्थापकीय समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

याचिकाकर्त्याचे अधिवक्ता हुजेफा अहमदी यांनी हा आदेश म्हणजे ‘प्लेेसेस ऑफ वरशिप ऍक्ट’चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन्.व्ही. रमणा म्हणाले, ‘‘मला कोणतीही माहिती नाही. मी असा आदेश कसा काय देऊ शकतो ? मी प्रकरणाची धारिका अभ्यासीन. मला विचार करण्यासाठी वेळ द्या !’’ असे सांगत त्यांनी सर्वेक्षणावरील स्थगितीची मागणी अस्वीकृत केली.