‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची यशस्वी चाचणी

नवी देहली – ‘ब्राह्मोस’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची बंगालच्या खाडीमध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ४५० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारताचे ‘सुखोई’ लढाऊ विमान अवकाशात १ सहस्र ५०० किमीपर्यंत अचूक लक्ष वेधू शकते. आता या नवीन क्षेपणास्त्रामुळे लढाऊ विमान २ सहस्र किमीपर्यंत मारा करू शकते.

‘ब्राह्मोस’च्या साहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, अण्वस्त्र ठेवण्यात आलेले बंकर, आदेश आणि नियंत्रण केंद्र, समुद्रातील विमानवाहू नौका यांवर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास साहाय्य होणार आहे. यानंतर ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता ८०० कि.मी.पर्यंत वाढवण्यात येणार आहे. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथे चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.