चंद्रपूर – महानगरपालिका प्रशासनाने हृदयरोगावरील उपचारार्थ प्रसिद्ध असलेले आधुनिक वैद्य रोहन आईंचवार यांच्या सी.एच्.एल्. रुग्णालयाचा परवाना ८ दिवसांसाठी निलंबित केला होतो; मात्र ३ दिवसांपूर्वीच हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आधुनिक वैद्य रोहन आईंचवार यांच्या सी.एच्.एल्. मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचे महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी प्रमाणपत्र महानगरपालिकेने ४ मे या दिवशी पुढील ८ दिवसांसाठी म्हणजे ११ मेपर्यंत निलंबित केले होते.
१. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांची अनुमती रहित करत नियमित सराव चालू करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण आधुनिक वैद्य आईंचवार आणि आधुनिक वैद्य विनोद नगराळे यांच्याकडे कोविड रुग्ण असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती.
२. पालिकेच्या आरोग्य विभागाने याची पडताळणी केल्यावर त्यात तथ्य आढळले. त्यामुळे २४ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य आईंचवार यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावून ८ दिवसांसाठी बाह्यरुग्ण सेवा बंद करण्यात आली, तसेच नोंदणी प्रमाणपत्रही रहित करण्यात आले होते.
३. निलंबन कालावधीत भरती असणाऱ्या रुग्णांवर उपचार चालू रहातील, असेही महापालिकेने नमूद केले होते; मात्र ११ मेपर्यंत निलंबन केले असतांना ९ मेपासून बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत् करण्याची अनुमती महापालिकेने दिली आहे.