श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणावर येत्या १९ मे या दिवशी न्यायालय निर्णय देणार !

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद या खटल्यावर येत्या १९ मे या दिवशी न्यायालय निर्णय देणार आहे. कटरा केशव देव मंदिराची देवता श्रीकृष्ण विराजमान आणि अन्य ६ जण यांनी रंजना अग्निहोत्री यांच्या माध्यमातून प्रविष्ट केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात येणार आहे.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, मोगल बादशाहाच्या आदेशानंतर वर्ष १६६९-७० मध्ये भगवान श्रीकृष्ण मंदिर तोडून तेथील १३.३७ एकर भूमीवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली आहे. तसेच या मशिदीत खोदकाम करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर येथे खोदकाम केले, तर येथे कारागृह सापडेल. जेथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित

श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातील एक याचिका सर्वोच्च न्यायालयातही प्रविष्ट करण्यात आलेली आहे. या याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, हिंदूंसमवेत विश्‍वासघात करून श्रीकृष्णजन्मभूमी कोणत्याही कराराविना मशिदीला देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने हे घोषित करावे की, १२ ऑगस्ट १९६८ या दिवशी शाही ईदगाह मशिदला कोणताही करार न करता मंदिराची जागा देण्यात आली आहे आणि ती जागा हिंदूंना परत देण्यात यावी.