भारताचे आण्विक सामर्थ्य वाढण्यासाठी फ्रान्स करणार साहाय्य

पॅरिस (फ्रान्स) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स यात्रेच्या वेळी आण्विक पुरवठादार समूह म्हणजे एन्.एस्.जी.मध्ये (न्यूक्लियर सप्लायर्स ग्रुपमध्ये) भारताला सदस्यत्व देण्याच्या फ्रान्सच्या भूमिकेचा त्याने पुनरुच्चार केला. या समूहामध्ये सहभागी झाल्यास भारताचे आण्विक सामर्थ्य गतीने वाढेल, अशी अपेक्षा आहे. आम्हीही या समूहामध्ये सहभागी होण्यासाठी सदस्य देशांच्या संपर्कात आहोत, असे भारताने स्पष्ट केले.

या समूहामध्ये ४८ देश असून परमाणू तंत्रज्ञान आणि आण्विक सामग्री यांचा व्यापार करण्यासाठी सहयोग केला जातो. चीन हा या समूहामध्ये भारताला अंतर्भूत करण्यास  विरोध करत आहे. त्याचा तर्क असतो की, जर भारत सदस्य बनू शकतो, तर पाकिस्तानलाही सदस्यत्व द्यायला हवे. (कावेबाज चीन ! – संपादक)

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘स्थायी’ सदस्य मिळण्यासाठी फ्रान्सचा पाठिंबा !

फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी फ्रान्सने पुन्हा एकदा भारताला त्याचा पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामधील बैठकीनंतर झालेल्या संयुक्त वक्तव्यांच्या वेळी ही माहिती देण्यात आली.

भारताला परिषदेचा स्थायी सदस्य बनण्याचा अधिकार आहे, असे अनेक वर्षांपासून  भारत म्हणत आला आहे. रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत. या देशांकडे ‘वेटो’चा अधिकार असून कोणताही निर्णय होऊ देणे अथवा न होऊ देणे हे या देशांच्या हातात असते.