अमेरिकेमध्ये गर्भपात करण्याचा महिलांना अधिकार आहे; मात्र या अधिकारावर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचे असे झाले की, ‘पॉलिटिको’ नामक एका संकेतस्थळाने तेथील सर्वाेच्च न्यायालयात गर्भपाताच्या संदर्भात चालू असलेल्या खटल्याच्या प्रकरणात न्यायाधिशांनी मांडलेल्या मतांची गोपनीय कागदपत्रे उघड केली आहेत. त्यावरून वर्ष १९७३ मध्ये तेथील महिलांना दिलेला गर्भपाताचा अधिकार काढून घेण्याच्या निर्णयाप्रत या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश पोचले असल्याचे समजते. निकाल देणारे न्यायाधीश ६-३ अशा फरकाने पूर्वी देण्यात आलेला गर्भपाताचा अधिकार रहित करतील, असा कयास आहे. ही गोपनीय कागदपत्रे फुटली आहेत. त्यामुळे यातील किती खरे, किती खोटे हे समजण्यास मार्ग नाही. असे असतांनाही अमेरिकेत या वृत्तामुळे गदारोळ माजला आहे. अनेक स्त्रीवादी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. देशाचे वातावरण ढवळून निघाल्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या प्रकरणात वक्तव्य करून महिलांना पाठिंबा दिला आहे. समजा सर्वाेच्च न्यायालयाने गर्भपाताच्या अधिकारावर बंदी घातली, तर ‘पुढे काय ?’, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. एवढे मात्र नक्की की, स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अमेरिकी समाजावर चाप बसावा, यासाठी काही धोरणात्मक पावले उचलण्यासाठी तेथील न्याययंत्रणा प्रयत्न करते, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
अमेरिकेतील स्वैराचार आणि अनाचार
‘गर्भपाताचा अधिकार हिरावला जाणार’, हे समजल्यावर चवताळलेल्या स्त्रीवाद्यांनी ‘माय बॉडी माय चॉईस’ असे फलक हातात धरून आंदोलने चालू केली आहेत. ‘माझ्या शरिरावर माझा अधिकार आहे. त्याचे काय करायचे आणि त्यासाठी कशाची निवड करायची, हा सर्वस्वी माझा अधिकार आहे’, असे या महिलांचे म्हणणे आहे.
स्वतःच्या शरिरावर स्वतःचा अधिकार असणे, हे योग्यच; मात्र त्या अधिकाराचा दुरुपयोग केला, तर ते योग्य कसे ? वर्ष २०११ ते २०१५ च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले-मुली शारीरिक संबंध ठेवतात. ‘हे प्रमाण आता अल्प झाले आहे’, असे म्हटले जात असले, तरी सुधारणा तितकीशी समाधानकारक नाही. यावर उतारा म्हणून तेथे मुलांना लहानपणापासून लैंगिक शिक्षण देण्याचा आग्रह केला जातो. येथे लैंगिक शिक्षण म्हणजे वयात येणाऱ्या मुलांमध्ये उफाळून येणाऱ्या लैंगिक भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे, हे शिकवले जात नाही, तर या वयात शारीरिक संबंध ठेवतांना कोणती काळजी घ्यायची ? गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा करायचा ? या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे ‘चुकीची कृती होणारच नाही’, याकडे लक्ष न देता ‘चुकीची कृती करतांना भविष्यात त्याचा त्रास होऊ नये; म्हणून ती कशी निस्तरायची ?’, हे शिकवले जाते. अमेरिकेत सामाजिक ढाचा हा असाच उच्छृंखलतेला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, विवाह न करता संबंध प्रस्थापित करणे, समलैंगिक संबंध आदी स्वैर गोष्टींना तेथे मान्यता आहे, नव्हे तेथील कायदेही स्वैराचाराला प्रोत्साहन देणारे आहेत. या कारणांमुळेच समाजातील वाढती गुन्हेगारी, मनोविकार, ताण-तणाव आदी सामाजिक समस्या तेथे भेडसावत आहेत.
स्वैराचारच सुधारणावाद झाला आहे !
अमेरिकेची समाजरचना पहाता तेथे नको असलेला गर्भ नाकारण्याच्या महिलांच्या अधिकारावर गदा येईल, असे चिन्ह तरी दिसत नाही. अमेरिकेत स्वैराचारालाच सुधारणावाद म्हटले जाते. त्यामुळे कुणीतरी वैयक्तिक पातळीवर गैरकृत्य करत असेल, तर त्याविषयी भाष्य करणे हे असांस्कृतिक किंवा सामाजिकदृष्ट्या चुकीचे समजले जाते. ‘अशा दिशाहीन समाजाच्या वर्तनात पालट करायचा असल्यास कायदा पुरेसा आहे का ?’ ‘जरी कायदा लागू झाला, तरी तेथील लोक त्याला जुमानणार आहेत का ?’, हे प्रश्नही ओघाने आलेच. काही क्षण ‘पॉलिटिको’च्या वृत्तावर विश्वास ठेवला, तर ‘अमेरिकेच्या सर्वाेच्च न्यायालयातील न्यायाधिशांना गर्भपाताला विरोध करणारा कायदा अस्तित्वात आणावासा का वाटत आहे ?’, हा येथे कळीचा प्रश्न आहे. यावरून सामाजात बोकाळलेला स्वैराचार रोखण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून तरी हात-पाय हालवण्याचा विचार तेथे रूढ होत आहे, हे स्पष्ट होते. या विचाराला समाजातील काही रूढीवादी ख्रिस्त्यांचाही पाठिंबा आहे. एवढेच कशाला ? काही स्त्रीवादीही ‘राईट टू लिव्ह’ म्हणजे ‘जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे’, असे सांगत गर्भपाताला प्रोत्साहन देणाऱ्या कायद्याला विरोध करत आहेत.
अमेरिकेत पाऊस पडल्यावर भारतात छत्री उघडणाऱ्यांची संख्या तशी लक्षणीय आहे. त्यामुळे अमेरिकेत ज्या काही सामाजिक चळवळी किंवा आंदोलने होतात, त्याचे पडसाद भारतातही उमटतात. भारतात स्वैराचारी विकृतीला प्रोत्साहन देणाऱ्यांनी अमेरिकी समाजाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी जे तोकडे प्रयत्न होत आहेत, त्यांचा विस्ताराने अभ्यास करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याला कोण नाही म्हणतो ? काही गंभीर कारणांसाठी गर्भपाताची अनुमती देणे योग्यच; मात्र स्वैराचाराने वागून त्यामुळे राहिलेल्या गर्भाची हत्या करणे, हे कोणत्या चौकटीत बसते ? हा गर्भपात नसून ती केलेली हत्याच होय. स्वातंत्र्याला चौकट किंवा मर्यादा हवी. ही मर्यादा किंवा चौकट जर धर्माधिष्ठित असेल, तर व्यक्ती आणि समाज यांचे कल्याणच होईल. हिंदु धर्मशास्त्रात व्यक्तीला घालून दिलेले सामाजिक नियम त्यामुळेच उठून दिसतात. एखादी गोष्ट ओरबाडून मिळवण्यात खरे सुख नसून संयमाने मनावर विजय मिळवण्यात खरा आनंद आहे. स्वातंत्र्याला या संयमाचे आणि त्यागाचे कोंदण असल्यास कुठलीही कृती ही विवेकाला धरून होते. असे नागरिक असलेल्या समाजात अशा समस्या उद्भवतच नाहीत. ‘अमेरिकेतील सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतन तेथील समाजधुरिणी रोखतील का ?’, हे ठाऊक नाही; मात्र भारतात तशी स्थिती उद्भवू नये; म्हणून आदर्श समाजरचनेविषयी नियम सांगणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक उत्कर्षासाठी दिशादर्शन करणाऱ्या हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक ! |