भारत आणि ‘नॉर्डिक’ देशांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी !

(‘नॉर्डिक’ देश म्हणजे फिन्लँड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि आईसलँड)

कोपेनहेगन (डेन्मार्क) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोपच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि नॉर्डिक देश यांच्यातील दुसरे शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत हे संमेलन पार पडले. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा, हवामान पालट, तसेच जागतिक स्तरावरील सुरक्षेसंबंधीच्या समस्या आदींविषयी यामध्ये चर्चा करण्यात आली.

‘या संमेलनामुळे भारत आणि नॉर्डिक देश यांच्यातील विविध स्तरांवरील संबंधांना चालना मिळाली असून नवीन तंत्रज्ञान, गुंतवणूक, स्वच्छ ऊर्जा, आर्टिक क्षेत्रातील संशोधन आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहभाग वाढेल’, अशी आशा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करून व्यक्त केली. पहिले शिखर संमेलन वर्ष २०१८ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोल्म येथे झाले होते.