संभाजीनगर – १ मे या दिवशी येथे झालेल्या सभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ११६, ११७ आणि १५३ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. या खटल्यात त्यांना जामीन मिळू शकतो; मात्र त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पहाता अन्वेषणानंतर आरोप सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर येथील सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे या प्रकरणी अन्वेषण देण्यात आले आहे. अहवालाच्या व्यतिरिक्त तक्रारीत म्हटल्यानुसार ठाकरे यांच्या वादग्रस्त भाषणांचे पुरावे गोळा केले जातील. साक्षीदार शोधले जातील. त्यानंतर आरोपींना जबाबासाठी नोटीस बजावून बोलावण्यात येईल, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.