हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. ३-४ वर्षांपूर्वी ‘गोवा राज्य भारतापासून वेगळे आहे’, असे सांगण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. आताही ‘झेवियर नव्हे, तर भगवान परशुराम गोव्याचा रक्षणकर्ता’, असे म्हटल्यावर पोर्तुगीजधार्जिण्या ख्रिस्त्यांना पोटशूळ उठला. गोमंतकियांवर अत्याचार करण्यास पुढाकार घेणारा फ्रान्सिस झेवियर त्यांना ‘गोयंचो सायब’ वाटतो. हे पाहून डॉ. टी.बी. कुन्हा यांचे विचार किती सत्य आहेत, याची प्रचीती येते.
१. गोमंतकाचा स्वातंत्र्यसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन करणारे पहिले स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !
‘गोमंतकाच्या आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक म्हणून डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा यांचा सार्थ गौरव भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नोंदला गेला आहे. गोमंतकाचा स्वातंत्र्यसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन करणारे आणि त्यानुसार कृती करणारे विचार मांडणारे डॉ. कुन्हा हे पहिले स्वातंत्र्यसेनानी होत. गोवा मुक्तीपूर्व गोवा काँग्रेस समितीचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. गोमंतकाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन जे नेते सतत कृतीशील राहिले, त्यांपैकी डॉ. टी.बी. कुन्हा एक होते.’
२. मानवतेला काळीमा फासणारे इन्क्विझिशन आणि गोव्यातील ख्रिस्त्यांना भारतीय प्रवाहापासून तोडण्याचे कारस्थान यांवर पुस्तक लिहून ख्रिस्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे डॉ. कुन्हा !
‘गोवा स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी लिहिलेल्या ‘पोर्तुगीज इंडिया’ आणि ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या दोन छोट्या पुस्तकांनी पोर्तुगीज साम्राज्य सत्तेची भयंकर चिरफाड केली होती. विशेषतः ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकाने ख्रिस्ती पोर्तुगीज साम्राज्यवादी किती धर्मांध आणि मानवताविरोधी आहेत, यांचे खुले दर्शन पुराव्यासहित घडवले होते. पोर्तुगीज ख्रिस्ती धर्मपिसाटांनी गोमंतकात जुलूम-जबरदस्तीने जे धर्मांतर घडवून आणले होते आणि मानवतेला काळीमा फासणारे इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा) आणून त्या काळात गोमंतकात जो अमानुष धर्मच्छल घडवला होता, त्याचे शब्दचित्रण त्यांनी या पुस्तकात केले. पोतुगिजांनी ख्रिस्ती धर्म आणि युरोपियन संस्कृती यांच्या नावाखाली गोव्यातील ख्रिस्ती समाजात (सक्तीने धर्मांतर केलेल्या) मानसिकदृष्ट्या पालट घडवून आणून या समाजाला मूळ भारतीय आणि राष्ट्रीय प्रवाहापासून अन् भारतीय संस्कृतीपासून कसे तोडले, याचे शब्दचित्रण या पुस्तकात दिले आहे. हा केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर पूर्णत: सांस्कृतिक दिवाळखोरीच होती, असे या पुस्तकाचे मर्म आहे. भारतातील कुठल्याही भागापेक्षा गोव्यावर खास करून बार्देश, सासष्टी आणि तिसवाडी या तालुक्यांत असली राजवट अधिक काळ टिकली; त्यामुळे त्याचे परिणाम खोलवर रुजले आहेत’, असे या पुस्तकात त्यांनी मांडले आहे.
३. आल्फान्सो द आल्बुकर्क याचा बुरखा फाडणारे डॉ. कुन्हा !
‘आल्फान्सो द आल्बुकर्क यांची तथाकथित सहिष्णुता आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे तथाकथित अद्भुत चमत्कार या इतिहासाचा एकही पुरावा नसलेल्या दोन दंतकथांचा स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा यांनी लिहिलेल्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकात पर्दाफाश केला आहे. आल्बुकर्कसंबधी माहिती देतांना त्यांनी २२.१२.१५१० या दिवशी लिहिलेल्या पत्राचा या पुस्तकात उल्लेख केला आहे. आल्बुकर्क त्या पत्रात लिहितो, ‘‘गोवा जिंकायला आणि प्रदेशाची विल्हेवाट लावत किल्ल्यात प्रवेश करायला आपल्या देवाची पुष्कळ कृपा झाली. सुमारे ३०० टर्क मारले गेले. बाणस्तरी आणि गवंढाळीला जायच्या मार्गांत पुष्कळ लोक मारले गेले. मग मी साऱ्या शहराला आग लावली. समोर दिसेल त्याला कापून काढले. कितीतरी दिवस आपल्या लोकांनी त्यांच्या रक्ताचे पाट वाहिले. कुठलाही मुसलमान दिसताक्षणी जिवंत सुटला नाही. मशिदी लोकांनी भरल्या आणि पेटवल्या. मुसलमानांनी राज्य सरकारविरुद्ध केलेल्या विश्वासघाताचा सूड घेतला.’’ (क्रमशः)
– श्री. जयेश थळी, म्हापसा, गोवा.