भाग्यनगर – ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लमीन’ (ए.आय.एम्.आय.एम्.) या पक्षाचे प्रमुख तथा खासदार असुदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते ‘आम्ही तुमच्या दडपशाहीला घाबरणार नाही, धीराने लढू, मैदान सोडणार नाही. आम्ही अल्लाच्या मार्गाने चालणार आहोत. देशात एका समुदायाला लक्ष्य केले जात आहे’, असे बोलतांना दिसत आहेत. यासह ते मुसलमानांना ‘मैदान न सोडण्या’चा सल्ला देत असल्याचेही दिसत आहेत.
ओवैसी यांनी श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराविषयीचे सूत्र सामजिक माध्यमांवर उपस्थित केले, तसेच पोलीस एका विशिष्ट समुदायावर कारवाई करत असल्याचा आरोप केला होता. भाजप फुटीर रणनीती अवलंबत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.