|
जळगाव – चाळीसगाव येथे राजपूतनगर येथील श्री सप्तशृंगीमातेच्या वर्धापनदिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते. ७ व्या दिवशी ह.भ.प. सोमनाथ महाराज जपे कीर्तन करत असतांना शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी येऊन कीर्तन बंद पाडले. ते बूट घालून वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचा विषय असणाऱ्या नारदांच्या गादीवर चढले. (अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी हा विषय लावून धरायला हवा ! – संपादक)
‘भोंग्यांच्या सूत्रावरून नियमावलीचे कारण देत त्यांनी वारकऱ्यांशी अरेरावी केली, तसेच त्यांनी वारकऱ्यांना मारहाण करण्याची धमकीही दिली’, असा आरोप वारकऱ्यांनी केला.
या प्रकरणामुळे वारकऱ्यांनी ‘झालेल्या प्रकारामुळे वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी तात्काळ क्षमा मागावी, अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू’, अशी चेतावणी दिली आहे.
पोलीस निरीक्षकांनी मागितली क्षमा !पोलीस निरीक्षक के.के. पाटील म्हणाले, ‘‘रात्री १० नंतर चालू असलेले कीर्तन बंद करण्यासाठी मी कीर्तनकारांना विनंती केली. या वेळी तेथे नारदाची गादी होती; परंतु तिचे महत्त्व मला ठाऊक नव्हते. मी अनावधानाने त्यावर बूट घालून गेलो. (जरी अगदी ‘नारदांची गादी’ याविषयी ठाऊक नसले, तरी कीर्तनकार कीर्तन करत असलेल्या व्यासपिठावर जातांना बूट घालू नयेत, इतके साधे सौजन्यही पोलिसांना नसणे लज्जास्पद नव्हे का ? – संपादक) माझ्या या कृतीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागतो.’’ (अशी जर-तरची भाषा कशाला ? – संपादक) |
कीर्तन गादीचा अपमान केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करा !
वारकरी संप्रदाय पाईक संघाची मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २८ एप्रिल (वार्ता.) – चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील सप्तशृंगीमाता मंदिरात ह.भ.प. सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन चालू असतांना रात्रीचे केवळ १० वाजून काही मिनिटे झालेली होती. असे असतांना कोणतीही मानमर्यादा न पाळता पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी पायातील बुटांसह कीर्तन मंडपात प्रवेश केला. यासमवेतच कीर्तनकार ज्या गादीवर उभे रहातात, त्या गादीपुढे ‘महर्षि नारदांची गादी’ म्हणून सकल वारकरी संप्रदाय नतमस्तक होतो, त्या गादीवर बूट घालून उभारत टाळकरी, पखवाजवादक यांना तात्काळ कीर्तन बंद करण्यासाठी धमकावण्याचा निंदनीय प्रकार केला. या प्रकरणी के.के. पाटील यांनी जुजबी क्षमा मागितली असली, तरी यावर संप्रदाय समाधानी नसून त्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना संगणकीय पत्त्यावर पाठवण्यात आले आहे. या निवेदनात असेही म्हटले आहे की, संबंधित पोलीस निरीक्षकाचे निलंबन न झाल्यास वारकरी संप्रदायाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी. (भोंग्यांच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींतून सर्रास त्याचे उल्लंघन होते; मात्र कोणताही पोलीस अधिकारी ते रोखण्याचा प्रयत्न करत नाही. मग न्यायालयाचे नियम केवळ हिंदूंसाठीच लागू आहेत का ? असे वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिकाकीर्तन बंद पाडायला हा देश भारत आहे कि पाकिस्तान ? असा प्रकार करण्याचे धाडस पोलिसांनी अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या वेळी दाखवले असते का ? |