‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणाऱ्या राणा दाम्पत्याला अटक !

आमदार रवी राणा आणि त्यांनी पत्नी नवनीत राणा(सौ. ANI )

मुंबई – ‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा करणारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांना २४ एप्रिल या दिवशी खार येथील पोलिसांनी अटक केली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना २५ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.

आमदार रवी राणा आणि त्यांनी पत्नी नवनीत राणा यांनी २४ एप्रिल या दिवशी ‘मातोश्री’च्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. यासाठी राणा दाम्पत्य २३ एप्रिल या दि वशी अमरावती येथून मुंबईत आले होते. राणा दाम्पत्य ‘मातोश्री’कडे येऊ नये, यासाठी शिवसैनिकांनी २३ एप्रिलपासून ‘मातोश्री’च्या बाहेर पहारा ठेवला होता. राणा दाम्पत्य बाहेर पडू नये, यासाठी शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाला घेराव घातला होता.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणतेही विघ्न नको, म्हणून आंदोलन मागे ! – आमदार रवी राणा

२४ एप्रिल या दिवशी पंतप्रधान मुंबईत येत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे की, पंतप्रधानांसारखे मोठे व्यक्तीमत्त्व आपल्या राज्यात येत असेल, तर त्यांच्या दौऱ्याला कुठल्याही प्रकारे गालबोट लागता कामा नये. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून माझे दायित्व आहे की, कायदा सुव्यवस्था बिघडू नये, नागरिकांना त्रास होऊ नये. पंतप्रधानांचा दौरा रहित होऊ नये, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही मत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात कोणतेही विघ्न नको, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.

उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक यांच्या विरोधात राणा दाम्पत्याची तक्रार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री अनिल परब आणि राणा दाम्पत्य यांच्या मुंबईतील निवासाबाहेर आंदोलन करणारे शिवसैनिक यांच्या विरोधात राणा दाम्पत्य यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ‘आम्ही केवळ मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जाणार आहोत; मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी आमची अडवणूक करण्यात आली. आम्हाला मारहाण झाल्यास रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली होती. आमच्या घराला वेढा देऊन आमच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असे या तक्रारीत म्हटले आहे.


… अन्यथा महाराष्ट्रात रहाणे कठीण करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

शिवसेनेचे नेते संजय राऊत

मुंबई – अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराच्या वेळी शिवसैनिक हुतात्मा झाले, त्या वेळी हनुमान चालीसावाले कुठे गेले होते ? अमरावतीहून मुंबईत येऊन आमच्यासमवेत वैर करू नये. अन्यथा महाराष्ट्रात रहाणे कठीण करू, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिली. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी येऊन हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याचे म्हटले होते. याला शिवसैनिकांनी विरोध दर्शवला होता. याविषयी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राणा यांना वरील चेतावणी दिली.