स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २ भ्रमणभाष क्रमांकांपासून सावध रहाण्याची खातेदारांना सूचना

नवी देहली – ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही वर्षांत बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना  जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी स्टेट बँक ऑफ इंडियाने तिच्या  अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्वीट करत तिच्या ४४ कोटी खातेदारांना सायबर गुन्हेगारांच्या ९१-८२९४७१०९४६ आणि +९१-७३६२९५१९७३ या दोन क्रमांकांपासून सावध रहाण्याची सूचना केली आहे. काही दिवसांपासून गुन्हेगार या दोन भ्रमणभाष क्रमांकांवरून कॉल करतात आणि लोकांना ‘केवायसी’ (कागदपत्रे) अद्यायावत करण्यास सांगतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा कॉलच्या फंदात पडू नये आणि कोणतीही मार्गिका (लिंक) उघडून स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये, असे बँकेने सांगितले आहे. फसवणूक झाली, तर बँकेच्या संकेतस्थळावर तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.