पुणे, २२ एप्रिल (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानामुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. पुण्यात २१ एप्रिल या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध व्यक्त करत महासंघाच्या शिष्टमंडळाने मिटकरी यांच्यावर त्वरित गुन्हा प्रविष्ट करून कायदेशीर कारवाई करण्याचे पत्रक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. या वेळी जिल्हाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आणि मागणीपत्रक गृह विभागाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन जल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्याचे महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी सांगितले.
या वेळी महासंघाचे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, संघटक सुनील शिरगांवकर, उपाध्यक्ष राहुल करमरकर, ब्रह्मद्योग आघाडी प्रमुख तेजस फाटक, पुरोहित आघाडीचे अध्यक्ष संतोष वैद्य, पेठ शाखा अध्यक्ष सचिन टापरे, तसेच मोठ्या संख्येने पुरोहित बांधव, जिल्ह्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून सामाजिक माध्यम, ‘डिजिटल मीडिया’, ‘पेपर मीडिया’, पोलीस ठाण्यात निवेदन देणे आदी विविध माध्यमांतून ब्राह्मण समाजावर झालेल्या अन्यायाविषयी असलेला समाजाचा रोष सरकारी यंत्रणेपर्यंत पोचवण्यात आला. |