१. आश्रमातील तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जातांना पोटर्यांमध्ये वेदना होऊ लागल्यामुळे पहिल्या मजल्यावरील सज्जामध्ये ठेवलेल्या बाकावर थोडा वेळ बसणे आणि एका साधकाला नामजप शोधून देणे
‘११.५.२०२१ या दिवशी रात्रीचा महाप्रसाद ग्रहण केल्यावर ८.१५ मिनिटांनी मी देवद आश्रमातील तळमजल्यावरील भोजनकक्षातून पहिल्या मजल्यावरील माझ्या खोलीकडे जात होतो. पायर्या चढतांना माझ्या पोटर्यांमध्ये वेदना होऊ लागल्या. त्यामुळे मी पहिल्या मजल्यावरील सज्जामध्ये ठेवलेल्या बाकावर थोडा वेळ बसलो. तेवढ्यात एका साधकाने मला त्याला होणार्या आध्यात्मिक त्रासांवर नामजप विचारला. मी त्याला नामजप शोधून दिला.
२. स्वतःला होणारा त्रास नाहीसा होण्यासाठी शोधलेला नामजप ३ – ४ मिनिटे करूनही त्रास न्यून न झाल्याने ‘खोलीत जाऊन झोपून जप करावा’, असे वाटणे
तेव्हा मला पुष्कळ थकल्यासारखे झाले होते. माझी प्राणशक्ती न्यून झाली होती. त्या दिवशी अमावास्या होती. मी माझ्या त्रासावर नामजप शोधल्यावर मला आकाशतत्त्वाचा जप आला. मी तेथेच बसून ३ – ४ मिनिटे नामजप केला. त्रास न्यून होत नसल्याने ‘खोलीत जाऊन झोपून जप करावा’, असे मला वाटले आणि मी खोलीत आलो.
३. प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकात प्रसिद्ध झालेली परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे पाहिल्यावर त्यांच्यातील चैतन्यामुळे त्रास नाहीसा होऊन उत्साही वाटणे
मी खोलीत आल्यावर २ मिनिटे नामजप केला. त्यानंतर मी ९.५.२०२१ या दिवशीच्या प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्तच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकात प्रसिद्ध झालेली प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे पहात होतो. तेव्हा ३ – ४ मिनिटांतच त्या अंकातील चैतन्यामुळे मला होत असलेला त्रास नाहीसा होऊन मला उत्साही वाटू लागले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सनातनच्या प्रत्येक वस्तूत पुष्कळ चैतन्य येणे आणि त्याचा लाभ आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना होणे
सनातनची प्रत्येक वस्तू, सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके, फलक (बॅनर), भित्तीपत्रके (पोस्टर्स) यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे पुष्कळ चैतन्य आले आहे. त्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाल्याने आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तींना लाभ होतो. त्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.५.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |