कॅनडातील खलिस्तानवादी नेत्याकडून भारत सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावल्याचा आरोप

विदेशात राजकारणात सक्रीय असणार्‍या अशा खलिस्तानवादी नेत्यांच्या विरोधात भारताने प्रथम पावले उचलावीत. खलिस्तानवाद समूळ नष्ट करण्यासाठी अशा नेत्यांवर प्रथम कारवाई करणे आवश्यक ! – संपादक

कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे जगमीत सिंह

ओटावा (कॅनडा) – भारतात रामनवमीच्या निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांच्या वेळी काही ठिकाणी दंगली उसळल्या. याविषयी कॅनडाच्या ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’चे नेते आणि खलिस्तानवादी विचारसरणीचे जगमीत सिंह यांनी भारतावर निशाणा साधला आहे. भारतातील मुसलमानांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मुसलमानविरोधी भावना भडकावल्याचा आरोप केला. (रामनवमीच्या मिरवणुकांवर दगडफेक करणारे धर्मांध होते, या वास्तवाकडे डोळेझाक करून भारत सरकारवर टीका करणार्‍या खलिस्तानवादी नेत्याचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक)

जगमीत सिंह यांनी नुकतेच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मी भारतातील मुसलमान समुदायाच्या विरोधातील छायाचित्रे आणि व्हिडिओ बघितले आणि त्यांना जाणूनबुजून देण्यात येणार्‍या हिंसाचाराच्या धमक्याविषयी चिंतित आहे. भारत सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावण्याचे थांबवावे.’ (ज्या देशात संप आणि निदर्शने यांमुळे आणीबाणी घोषित होते, त्या देशाच्या नेत्यांनी भारतातील समाजव्यवस्थेवर बोलणे हा बालीशपणा नव्हे तर काय ? – संपादक)