भारतात यंदा ९९ टक्के पाऊस पडणार ! – भारतीय हवामान विभागाचा अंदाज

गुजरात आणि राजस्थान राज्यांत अल्प पावसाची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – ‘स्कायमेट’ या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या खासगी आस्थापनानंतर आता भारतीय हवामान विभागानेही यंदा देशभरात मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याचे घोषित केले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजात ५ टक्के अल्प-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. थोडक्यात देशभरात ९६ ते १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. देशभरातील ७०३ जिल्ह्यांचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला. ‘गुजरात आणि राजस्थान वगळता देशातील सर्व भागांत चांगला पाऊस पडेल’, असेही विभागाने म्हटले.

मराठवाडा आणि विदर्भ यांनाही मिळणार दिलासा !

यंदा महाराष्ट्रातही चांगला पाऊस होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. प्रतिवर्षीप्रमाणे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असेही विभागाने म्हटले आहे.