भारत एक मास पुरेल इतके तेल आयात करतो, तर तितकेच तेल युरोप रशियाकडून अर्ध्या दिवसात घेतो !

  • भारताने पाश्‍चात्त्य राष्ट्रांना सुनावले !

  • अमेरिकेचे भारताला रशियासमवेत शस्त्रकरार न करण्याचे आवाहन

  • भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिका अन् अन्य पाश्‍चात्त्य देश यांनी भारताला सांगू नये. ‘त्यांनी त्यांच्या देशाचीच काळजी करावी’, असे भारताने ठणकावून सांगितले पाहिजे ! – संपादक
  • युक्रेनला साहाय्य करण्याचे आश्‍वासन देऊन त्याचा विश्‍वासघात करणार्‍या या देशांनी भारताला शिकवू नये ! – संपादक
(डावीकडून) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन व भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – भारत त्याच्या ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार खनिज तेल रशियाकडून आयात करतो; परंतु उपलब्ध आकडेवारी पहाता भारताची रशियाकडून मासाभरात होणारी तेल आयात युरोपीय देशांनी अवघ्या अर्ध्या दिवसात केलेल्या आयातीपेक्षाही अल्प आहे. त्यामुळे आपण त्या वास्तवाचाही विचार अवश्य करावा, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी अमेरिकेतील पत्रकारांना उत्तर देऊन गप्प केले. वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात मंत्रीस्तरीय बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अमेरिकेचे ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ (परराष्ट्रमंत्री) अँटनी ब्लिंकन हेही उपस्थित होते.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ‘रशियासमवेत शस्त्रपुरवठ्याचे नवे मोठे करार करू नयेत’, असे आवाहन आम्ही सर्व देशांना करत आहोत,’ असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत केले.

१. ‘भारताने युक्रेनवरील आक्रमणावरून रशियाचा निषेध का केला नाही ?’, असे विचारले असता जयशंकर यांनी सांगितले की, भारताने संयुक्त राष्ट्र संघ, संसद आणि इतर व्यासपिठे यांवर युक्रेनप्रश्‍नी कोणती भूमिका घेतली, हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी आता निदर्शनास आणले. कुठल्याही संघर्षाला भारताचा विरोधच आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरी यांद्वारे प्रश्‍न सोडवावेत, अशीच आमची भूमिका आहे. हा संघर्ष आणि हिंसाचार तातडीने बंद व्हावा, अशीच भारताची भूमिका आहे. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याची भारताची सिद्धता आहे.

२. अँटनी ब्लिंकन म्हणाले की, भारत-रशिया मैत्रीचा मोठा इतिहास आहे. त्यात सैनिकी सहकार्य अंतर्भूत आहे. अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेची भारताशी संरक्षणादी क्षेत्रांत फारशी भागीदारी नसतांना रशियाशी भारताची मैत्री होती; मात्र आता अमेरिका भारताशी संरक्षणविषयक भागीदारीस अनुकूल आहे. जेव्हा भारताने रशियाकडून ‘एस्-४००’ हवाई संरक्षण प्रणाली घेतली, तेव्हा अमेरिकेच्या निर्बंधविषयक कायद्यानुसार आम्ही निर्बंध अथवा सवलत देण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘भारतातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी आम्ही चिंतित !’ – अँटनी ब्लिंकन

भारतातील कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी ब्लिंकन यांनी बोलण्याऐवजी त्यांच्याच देशात होणार्‍या वर्णद्वेषी आक्रमणांच्या संदर्भात चिंता करावी आणि ती कशा होणार नाहीत, यांकडे अधिक लक्ष द्यावे ! भारताने अमेरिकेला हे स्पष्टपणे बजावण्यासह यापुढे अमेरिकेतील मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी चिंता व्यक्त करण्यास चालू करून प्रत्युत्तर देत रहावे ! – संपादक

अँटनी ब्लिंकन या वेळी भारतातील अंतर्गत घटनांवरून म्हणाले, ‘आम्ही मानवाधिकार आणि लोकशाही मूल्ये यांच्या संरक्षणासाठी कटीबद्ध आहोत. भारताशीही या सूत्रांवर आमचा नियमित संवाद असतो. या संदर्भात भारतात अलिकडे घडलेल्या काही चिंताजनक घटनांकडे आमचे लक्ष आहे. भारतातील काही राज्यांतील सरकारे, पोलीस आणि तुरुंगाधिकारी यांच्याकडून मानवाधिकारांची पायमल्ली चालू आहे, त्याविषयी आम्हाला चिंता वाटते.’ ब्लिंकन यांनी यासंदर्भात कोणतेही उदाहरण दिले नाही.