सौंदर्य स्पर्धा नको !

४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे फेसबूकवरील एका लिखाणामध्ये वाचनात आले. या सौंदर्य स्पर्धा म्हणजे ‘रिॲलिटी शो’चा पुढचा टप्पा असल्याने त्यातील धोके वेळीच ओळखले पाहिजेत. सौंदर्य स्पर्धा ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. सध्या महिलांवरील अत्याचार पाहिल्यास अशा प्रकारच्या सौंदर्य स्पर्धा भरवणे आणि त्याही अल्पवयीन मुलींसाठी हे अतिशय संतापजनक अन् गंभीर आहे. या वयामध्ये मुलींवर योग्य संस्कार होणे अपेक्षित असतांना सौंदर्य स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना बहिर्मुख करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच त्यांच्या कोवळ्या मनावर होणारा परिणाम काय असणार ? हे वेगळे सांगायला नको.

सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने पोशाख निवडले जातील. सध्या बाजारात उपलब्ध असलेले पोशाख ‘महिलांनाही लाज वाटेल’, अशा पद्धतीचे आहेत. असे पोशाख लहान मुलींना घालण्यासाठी दिल्यास त्यांच्यावर काय संस्कार होणार ? विशेष म्हणजे हे सर्व करायला काही पालकांनाही काहीच वाटत नाही, तर काहींना भूषणावह वाटते, हे दुर्दैवी आहे. स्वतःच्या भांडवली प्रचारासाठी निष्पाप, निरागस मुलींच्या मनात या स्पर्धेच्या निमित्ताने कोणती बीजे पेरली जाणार आहेत, याचा विचार पालकांनी करायला हवा. ज्या वयात मुलींच्या बौद्धिक सौंदर्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्याऐवजी शरीर सौंदर्यावर भर देण्यासाठी चालू असलेले प्रयत्न चिंताजनक आहेत.

अशा प्रकारच्या स्पर्धांवर सुजाण पालकांनी बहिष्कार टाकण्यासह त्याचा वैध मार्गाने विरोध करायला हवा. मुलींना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देण्याऐवजी मैदानी खेळ, स्वरक्षण प्रशिक्षण, बुद्धीबळ स्पर्धा, तसेच भरतकाम, विणकाम, संगीत, नृत्य अशा स्वतःमध्ये विकास करणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. गुणांचा विकास करणाऱ्या स्पर्धा भरवल्यास मुलींनाही स्वतःमध्ये गुणांचा विकास करण्याची प्रेरणा मिळेल. याउलट सौदर्यं स्पर्धांमुळे मुलींवर आणि लहान मुलांवरही अयोग्य संस्कार होणार, हे नक्की ! सद्यःस्थितीत जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले, तसे संस्कार करणे आवश्यक आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या कर्तृत्ववान विरांगनांचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्पर्धा भरवणेच योग्य !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे