जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे ! – जागतिक आरोग्य संघटना

विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा हा दुष्परिणाम होय !

जिनेव्हा (स्विट्झर्लंड) – जगातील ९९ टक्के लोकसंख्या दूषित हवेत श्‍वास घेत आहे. त्यामुळे श्‍वसनाच्या आजारांचा धोका वाढत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये बहुतांश मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांचा समावेश आहे.

१. जगभरातील ११७ देशांतील ६ सहस्रांहून अधिक शहरांमधील हवेची गुणवत्ता पडताळल्यानंतर हे निकाल घोषित करण्यात आले आहेत. हवा अशीच प्रदूषित होत राहिली, तर एक दिवस माणसाला कायमस्वरूपी मास्क लावूनच फिरावे लागेल.

२. या अहवालानुसार हवा प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत. इंधन जाळल्यामुळे, वाहने, उद्योग, वीज प्रकल्प यांतून निघणार्‍या धुरामुळे हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढत आहे. त्यामुळे लाखो लोक श्‍वसनाच्या आजाराने अकाली मरत आहेत.

३. या अहवालात जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक डॉ. मारिया नीरा यांनी नमूद केल्यानुसार गेल्या वर्षी वायू प्रदूषणामुळे ७० लाख लोकांचा मृत्यू झाला. प्रदूषित हवेचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यासोबतच माणसांच्या कामावरही परिणाम होतो.