मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ५ एप्रिल या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांची दादर येथील १ सदनिका, तसेच रामनाथ (अलिबाग) येथील ८ भूखंड कह्यात घेतले. या मालमत्तांची एकूण किंमत ११ कोटी १५ लाख रुपये आहे.
मुंबईतील पत्राचाळ खरेदीतील १ सहस्र ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. या व्यवहारातील पैशांतून संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर कारवाई ! – खासदार संजय राऊत
माझ्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार बनले. सरकार पाडण्यासाठी मी विरोधकांना सहकार्य केले नाही. त्यामुळे माझ्यावर ही कारवाई करण्यात आली. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले, तर मी राजकारण आणि समाजकारण सोडीन अन् माझी उर्वरित सर्व संपत्ती भाजपच्या नावावर करीन. मी माझी संपत्ती कष्टाने कमावलेली आहे. या सूडाच्या राजकारणाला मी घाबरत नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. येणाऱ्या दिवसांत सत्य बाहेर येईल.