पशूहत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करा ! – कर्नाटक सरकारचा आदेश

या आदेशामुळे हलाल मांसवर अप्रत्यक्ष बंदी !

सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्याच्या पशुपालन आणि पशु वैद्यकीय सेवा विभागाने ‘पशूहत्या करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया केली पाहिजे ?’, या संदर्भात सर्व पशूवधगृहांना आदेश दिला आहे. यात म्हटले आहे, ‘कोणत्याही पशूची हत्या करतांना त्याला शुद्धीवर ठेवू नये. हत्येपूर्वी पशूला बेशुद्ध करणे आवश्यक आहे.’ पशूला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्या डोक्यावर आघात केला जातो किंवा गॅस अथवा वीज यांचा झटका दिला जातो. त्यानंतर त्याची हत्या केली जाते. सध्या राज्यात हलाल मांसाला विरोध होत आहे. त्या पार्श्‍वभूमी या आदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता रमझान मासही चालू झाला आहे. मुसलमानांमध्ये प्राण्यांची गळ्याकडील नस कापून रक्तस्राव होऊन त्याची हत्या केली जाते. यात प्राण्याला प्रचंड वेदना होतात. अशा हत्यांवर या आदेशामुळे बंदी येणार आहे.

या आदेशानंतर बेंगळुरू महानगरपालिकेने म्हटले आहे की, पशूवधगृह आणि मांस विक्रीची दुकाने यांना अनुज्ञप्ती (परवाने) देतांना त्यांच्याकडे पशूंना बेशुद्ध करून हत्या करण्याची सुविधा आहे कि नाही ?, याची तपासणी करण्यात येईल.

काँग्रेसकडून आदेशाला विरोध !

पशूविभागाच्या आदेशाविषयी लोकांना आवाहन करतांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी म्हणाले, ‘‘तुम्ही घाबरू नका. काही अडचण असेल, तर मला संपर्क करा. मी माझे कार्यकर्ते पाठवीन. मला अशा प्रकारच्या आदेशामुळे आश्‍चर्य वाटले आहे. लोक ज्या प्रकारे आतापर्यंत पशूहत्या करत होते, तशीच त्यांनी करत रहावी.’’