१. इम्रान खान यांची साडेतीन वर्षांची कारकीर्द पाकिस्तानच्या प्रगतीच्या दृष्टीने अपयशी ठरणे
सध्या पाकिस्तानमध्ये प्रचंड अराजकता माजलेली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या साडेतीन वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कुठलेही लक्षवेधी काम करता आले नाही. त्यांनी खेळाडू म्हणून पुष्कळ चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेटमधील विश्वचषक (वर्ल्ड कप) जिंकला आहे. त्यांची कुठलीही घराणेशाही नव्हती. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नव्हते. उलट त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या आईच्या नावाने एक कॅन्सर रुग्णालय उभे केले होते. पूर्वीच्या पाकिस्तानी शासनकर्त्यांच्या तुलनेत त्यांची प्रतिमा अतिशय चांगली होती. त्यामुळे ‘इम्रान खान यांच्या नेतृत्वात नवीन पाकिस्तान उभा राहून देशाची प्रगती होईल’, अशी तेथील लोकांची भावना होती. ज्या वेळी आपण देशाची प्रगती म्हणतो, तेव्हा आर्थिक आणि सामाजिक प्रगती व्हावी, देशाची सुरक्षा सबळ व्हावी, युवकांना रोजगार मिळावा, आतंकवाद अल्प व्हावा इत्यादी गोष्टी अपेक्षित असतात. इम्रान खान त्यांच्या कारकीर्दीत अशा कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत.
पाकिस्तानमधील महागाई आज शिगेला पोचली आहे. त्यांच्याकडे विदेशातून थेट गुंतवणूक बंद आहे. त्यामुळे तेथे रोजगाराची कोणतीही निर्मिती होत नाही. भ्रष्टाचारही प्रचंड वाढला आहे. अशा स्थितीत पाकिस्तान केवळ कर्ज घेऊन स्वत:ला जिवंत ठेवतो आहे. पाकिस्तानने ‘इंटरनॅशनल मॉनेटरी फंड’ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी), तसेच अन्य माध्यमातून अनुमाने १५ वेळा कर्ज घेतले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट झाली आहे. तेथे प्रत्येक भागात हिंसाचार चालू आहे. त्यामुळे पाकिस्तान हा अतिशय असुरक्षित देश बनला असून तेथील लोकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. प्रशासकीय व्यवस्था म्हणून काहीही काम झालेले नाही. त्यामुळे इम्रान खान यांची कारकीर्द अयशस्वी समजली जाते.
२. पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या चुका त्यांच्या मुळावर उठणे
२ अ. इम्रान खान यांनी अर्थव्यवस्थेच्या सुधारणांविषयी अर्थ सल्लागार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांचे न ऐकणे : इम्रान खान स्वत: प्रामाणिक होते; परंतु राज्यकारभार कसा करायचा, हे त्यांना माहिती नव्हते. जेव्हा त्यांना त्यांच्या अर्थ सल्लागारांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक कर भरत नाहीत. त्यामुळे त्यांना कर भरण्यास भाग पाडायला पाहिजे, कर वाढवायला हवा, तसेच भ्रष्टाचारही थांबला पाहिजे. इम्रान खान यांनी त्यांचे ऐकले नाही आणि कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यास सिद्धता दर्शवली नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अर्थतज्ञ किंवा जागतिक बँक यांनी दिलेले सल्लेही इम्रान खान कृतीत आणण्यास सिद्ध नव्हते. पाकिस्तानी जनतेला सगळे फुकटामध्ये घ्यायची सवय झालेली होती. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेची शक्ती कमकुवत होत गेली. पाकिस्तानी सैन्याचा खर्चही कर्ज घेऊन चालवला जातो. यावरून त्यांची स्थिती लक्षात येते.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
२ आ. देशांतर्गत कठोर कारवाई करता न येणे : इम्रान खान यांना कठोर कारवाई करणे जमले नाही. त्यांचे विदेशी धोरणही पूर्णपणे अयशस्वी झाले होते. पाश्चात्त्य जग आणि अमेरिका त्यांच्यावर रागवले आहेत, तसेच रशियाही त्यांना साहाय्य करण्याच्या स्थितीत नाही. त्यांची सर्वांत मोठी चूक म्हणजे त्यांच्या देशात विविध आंदोलने चालू होती, हिंसाचार चालू होता, त्या लोकांशीही त्यांना संवाद साधणे जमले नाही.
२ इ. पाकिस्तानचे तालिबानविषयीचे धोरण फसणे : जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आले, तेव्हा इम्रान खान किंवा पाकिस्तान यांना वाटले होते की, हा त्यांचा प्रचंड मोठा विजय आहे. ६ मासांनंतर असे दिसते की, अफगाणिस्तान पाकिस्तानचा मित्र होण्याऐवजी शत्रू अधिक झाला आहे. पाकिस्तानच्या २ मोठ्या आतंकवादी गटांचे तळ अफगाणिस्तानमध्ये आहेत आणि तेथून ते पाकिस्तानमध्ये आतंकवादी कारवाया करत असतात. तालिबानला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात असलेली ‘ड्युरंड सीमारेषा’ (अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील २ सहस्र ४३० किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमा) मान्य नाही. त्यामुळे त्या सीमेवर नेहमीच अशांतता असते.
२ ई. पाकिस्तान चीनचा कायमचा आर्थिक गुलाम बनणे आणि पाकिस्तानमध्ये वीज चोरण्यासह ती पूर्णपणे वाया जाणे : चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा एक पांढरा हत्ती बनला आहे. त्यातून पाकिस्तानला काहीही निष्पन्न होत नाही. त्यांनी चीनकडून प्रचंड कर्ज घेतले आहे, जे त्यांना फेडावे लागणार आहे, तसेच पाकिस्तान चीनचा कायमचा आर्थिक गुलाम बनला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये अनेक ठिकाणी चीनकडून वीज निर्मिती केली जाते आणि ही वीज पाकिस्तानला विकली जाते. पाकिस्तानमध्ये ५० टक्के वीज चोरली जाते; कारण तेथे पैसे भरून वीज घेण्याची पद्धत नाही. त्यामुळे ही वीज पूर्णपणे वाया जात आहे. अशा स्थितीत विविध राजकीय पक्ष त्यांच्या विरोधात गेले आहेत.
उ. ‘आय.एस्.आय.’च्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून इम्रान खान यांनी पाकच्या सैन्याचा रोष ओढवून घेणे : इम्रान खान यांचा त्यांच्या सैन्याशीही संघर्ष उडाला. ‘पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आय.एस्.आय.’च्या प्रमुखाची नियुक्ती ते स्वत: करतील’, असे इम्रान खान यांनी सांगितले. ते सैन्याला अजिबात आवडलेले नाही. इम्रान खान पंतप्रधान बनले होते, तेव्हा त्यांना सैन्याकडून सर्वांत मोठा पाठिंबा मिळाला होता; पण आता पाकिस्तानी सैन्य विरोधात गेल्याने त्यांची गच्छंती ही अटळ आहे. अशा प्रकारच्या अनेक चुका इम्रान यांनी केल्या आहेत.
३. इम्रान खान यांनी त्यांना पदच्युत करण्यामागे अमेरिका असल्याचा आरोप करणे आणि अमेरिकेने तो फेटाळणे
‘मला हटवण्यामागे परकीय शक्तींचा, म्हणजे अमेरिकेचा हात आहे’, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे. इम्रान खान यांचे हे आरोप अमेरिकेने फेटाळले आहेत. ‘सध्या ते अशी कुठलीही गोष्ट करत नाहीत’, असे अमेरिकेने म्हटले आहे. सध्या अमेरिका आणि पाश्चात्त्य जग यांच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्त्व फारसे राहिलेले नाही. अफगाणिस्तानमध्ये आतंकवादाच्या विरोधात लढायचे असेल, तर पाकिस्तानचे स्थान (लोकेशन) अतिशय महत्त्वाचे होते. आता जगाने अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे महत्त्व अतिशय न्यून झाले आहे. पाकिस्तान ‘आतंकवाद पुरस्कृत देश’ असल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या ‘फायनान्शिअल टास्क फोर्स’ने त्याला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये ठेवले आहे. पाकिस्तानमध्ये कुणीही पंतप्रधान बनला, तरी खरे सत्ताधीश हे त्यांचे सैन्यच असते; म्हणून इम्रानच्या ठिकाणी अन्य दुसरा नेता आणण्यात अमेरिकेला स्वारस्य नाही. त्यामुळे इम्रान खान यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही.
४. पाकिस्तानची दयनीय स्थिती !
महागाई ही पाकिस्तानच्या मुळावर उठली आहे. अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.
-(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन