आदि शंकराचार्यांची चालू केली होती यात्रा !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माची ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्राचीन ‘छडी यात्रे’चे लवकरच प्रयागराज येथील कुंभक्षेत्री आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी ही यात्रा हरिद्वारहून निघाली आहे. परंपरेप्रमाणे श्री पंच दशनाम आवाहन आखाड्यातील साधू-संत हे या छडी यात्रेसह आहेत. या यात्रेचे नेतृत्व आवाहन आखाड्याचे दादाजी धउनीवाले श्रीमहंत गोपाल गिरी महाराज हे करत आहेत. २७ फेबु्रवारीपर्यंत कुंभक्षेत्री आवाहन आखाड्यात या पवित्र छडीचे दर्शन सर्वांना घेता येणार आहे.
यात्रेचे यंदाचे १ सहस्र २२० वे वर्ष !
या यात्रेचे यंदाचे १ सहस्र २२० वे वर्ष आहे, असे म्हटले जात आहे. भारतातील मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आदि शंकराचार्यांनी आवाहन आखाड्यातील ५५० नागा साधूंसह सर्वप्रथम छडी यात्रा चालू केली होती, अशी एक मान्यता आहे.