आज १ एप्रिल २०२२ या दिवशी ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदानदिन’ आहे. त्यानिमित्त…
१. धर्मवीर छत्रपती संभाजी बलीदानदिन म्हणजे फाल्गुन अमावास्या आणि गुढीपाडवा म्हणजे चैत्र शु. प्रतिपदा (नववर्षदिन) हे दोन महत्त्वाचे; पण वेगळे दिन असणे
धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षदिन लागोपाठ येतो. महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या महाराष्ट्रात असे घडणे, हे चिंताजनक आहे.
२. छत्रपती शंभूराजांचा मृत्यू आणि नववर्षाची गुढी यांचा एकमेकांशी संबंध नसणे !
शंभूराजे म्हणजे
‘देश-धरम पर मिटनेवाला । शेर शिवा का छावा था ।
महापराक्रमी परम प्रतापी । एक हि शंभूराजा था ॥’
हे शाहीर योगेशांचे शब्द यथार्थ वाटू लागले. शिवरायांच्या मृत्यूसमयी असलेला राज्यविस्तार शंभूराजांनी दुप्पट केला. त्यांचा खजिना अनेक पटीने वाढवला. सेना दुपटीपेक्षा अधिक केली. केवळ पावणेनऊ वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक लढाया केल्या आणि त्यातील बहुतेक जिंकल्या. त्याबरोबरच ‘सातसतक’, ‘नायिकाभेद’ आणि ‘नखशिख’ हे हिंदी काव्यग्रंथ, तर ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ रचला. अशा या गुणी आणि विद्वान राजाला औरंगजेबाने अत्यंत हाल करून ठार केले. तो दिवस होता फाल्गुन अमावास्या ! दुसर्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता; म्हणून जाणीवपूर्वक शंभूराजांचे डोके भाल्यावर टोचून फिरवण्यात आले.
वस्तुतः या गोष्टीचा गुढीपाडव्याच्या गुढीशी काहीच संबंध नाही. श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परतले, तेव्हापासून गुढ्या-तोरणे उभारण्याची हिंदूंची परंपरा आहे.
३. धर्मवीर शंभूराजांचा ‘बलीदानदिन’ गांभीर्याने पाळणे आवश्यकच; पण त्याचे सावट दुसर्या दिवसाच्या हिंदूंच्या नववर्षदिनावर पडणे, हे अयोग्य असणे !
गुढीपाडव्याचा आदला दिवस हा धर्मवीर शंभूराजांचा बलीदानदिन म्हणून गांभीर्याने पाळला जायलाच हवा; पण त्याचे सावट दुसर्या दिवसाच्या आनंदावर कशासाठी ? घरातील कुणी गेले, तरी १२ दिवस गांभीर्य राखून तेराव्याला गोडधोड जेवण करतात. शंभूराजांच्या नावाने ज्यांना केवळ राजकारणच करून स्वतःचे महत्त्व वाढवायचे आहे आणि जातींमध्ये वैमन्यस्य निर्माण करायचे आहे, अशा लोकांच्या डोक्यातच गुढीविषयीची विकृत कल्पना शिजली असणार. शिवराय अथवा शंभूराजे यांच्या मृत्यूमुळे विवक्षित जातीच्या लोकांना आनंद झाल्याचे खोटे ढोलसुद्धा वाजवले जात आहेत. असे करतांना आपल्या जातीतील किती जणांनी शिवराय आणि शंभूराजे यांना पाठिंबा दिला होता अन् किती जण त्यांच्या विरोधात उभे होते, हे एकदा पडताळून पहावे. एखादा माणूस वाईट असणे, ही त्याची वैयक्तिक दुर्बलता असते. त्यावरून अख्खी जात दोषी ठरत नाही, हे लक्षात ठेवायला हवे !
४. हिंदूंचे नववर्ष हिंदुस्थानात हिंदु परंपरेप्रमाणे साजरे व्हायला हवे !
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘नववर्ष स्वागतयात्रा’ उपक्रमाचे लोण अनेक शहरांमध्ये पसरू लागले आहे. पारंपरिक पोशाख आणि वाद्ये यांनी त्या सजायला हव्यात. ३१ डिसेंबरच्या अंगविक्षेप नाचगाण्यापेक्षा हे चित्र नक्कीच सुखद असेल. हिंदूंचे नववर्ष हिंदुस्थानात साजरे होणार नाही, तर कुठे होणार ?
– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली (साभार – ‘श्रीगजानन आशिष’, मार्च २०१०)