‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांकडून अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने

मुख्य प्रवेशद्वाराला लावला भगवा रंग !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने करताना ‘भाजयुमो’चे कार्यकर्ते

नवी देहली – भाजपच्या ‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या कार्यकर्त्यांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने केली. त्यांनी घराच्या प्रवेशद्वारावर भगवा रंग लावला. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवार्‍याचा वापर केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी बोलतांना ‘काश्मिरी हिंदूंवर अत्याचार झालाच नाही’, असा दावा केला होता. यावरून ही निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये मोर्चाचे अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केजरीवाल याची हत्या करण्याचा भाजपचा डाव ! – उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा आरोप

देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करून भाजपवर आरोप केला की, भाजपच्या गुंडांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली. भाजपच्या पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी ते या गुंडांना प्रवेशद्वारापर्यंत घेऊन आले. या गुंडांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा कठडे तोडून टाकले. पूर्वनियोजित कट रचून अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्रमण करण्यात आले. केजरीवाल यांना निवडणुकीत हरवू शकले नाही; म्हणून आता त्यांची हत्या करून त्यांना संपवण्याचा भाजपचा डाव आहे.