पणजी, ३० मार्च – चैत्र शुक्ल प्रतिपदेला; म्हणजेच गुढीपाडव्याला प्राचीन परंपरा असलेल्या भारतीय नववर्षाचा प्रारंभ होत असून गोव्यात ठिकठिकाणी नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात येणार्या प्रभातफेर्या आणि सभा यांच्या कार्यक्रमात भारतीय परंपराभिमानी नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, तसेच प्रत्येक घर, आस्थापने अन् मंदिरात भगवा ध्वज किंवा गुढी किंवा पताका उभारावी, असे आवाहन हिंदू रक्षा महाआघाडीच्या ३० मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले. या वेळी राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, योग शिक्षक डॉ. सूरज काणेकर, सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत, मंदिर महासंघाचे श्री. चंद्रकांत तथा भाई पंडित, प्रा. प्रवीण नेसवणकर , श्री. गणेश गावडे, श्री. सुरेश डिचोलकर आणि शुभांगी गावडे यांची उपस्थिती होती.
आतापर्यंत गोव्यात गेल्या काही वर्षांपासून नववर्ष स्वागताचे मोठे सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रभातफेर्या १५ ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेतच. यंदा हिंदू रक्षा महाआघाडीच्या सर्व तालुका समित्यांनी केलेल्या प्रयत्नांतून नववर्ष स्वागताच्या ५५ स्थानांच्या कार्यक्रमांची यात भर पडणार असल्याची, तसेच १ लाख घरे आणि मंदिरे यांवर भगवे ध्वज किंवा पताका किंवा गुढ्या उभारण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
१. हिंदू रक्षा महाआघाडीमध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या छोट्या-मोठ्या हिंदु संस्थांची संख्या १ सहस्र १०० वर पोचली असून वर्षभरात वर्ष २०२२ साठी गोव्यातील सुमारे १० सहस्र संस्था सहभागी करण्याचे लक्ष्य सर्व तालुका समित्यांनी मिळून डोळ्यांसमोर ठेवलेले आहे.
२. येत्या ३० एप्रिल आणि १ मे या कालावधीत २५० हिंदु युवतींचा स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग वेर्णा, सासष्टी येथे घेण्यात येणार आहे.
३. महाआघाडीच्या कार्याच्या विस्ताराच्या दृष्टीने गोव्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिका स्तरावर समित्या येत्या ऑक्टोबरपर्यंत स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे डॉ. सूरज काणेकर यांनी सांगितले.
४. हिंदु नववर्ष कालगणना, तसेच या दिवशी कडुलिंबाचा रस घेण्यामागील शास्त्रीय दृष्टीकोन सौ. शुभा सावंत यांनी विशद केला.
५. हिंदु धर्मशिक्षणाचे अभ्यासवर्ग प्रत्येक तालुकास्थानी असे दोडामार्ग तालुका धरून १३ ठिकाणी येत्या मे महिन्यात घेण्यात येणार असल्याचे मंदिर महासंघाचे श्री. चंद्रकांत तथा भाई पंडित यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत आणि परिचय साहाय्यक निमंत्रक संदीप पाळणी यांनी, तर आभारप्रदर्शन शुभांगी गावडे यांनी केले.