काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न !

मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापिठातील भग्नावस्थेतील मूळ मंदिर

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शारदा पीठ कश्मिरी हिंदूंच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये शारदापिठाच्या परिसरातील शारदादेवीचे मूळ प्राचीन मंदिर सध्या भग्नावस्थेत आहे. त्याच्या समोरच उत्तर काश्मीरच्या भारत-पाक नियंत्रणरेषेलगतच्या टीटवाल (कुपवाडा) सेक्टरमधील किशनगंगा खोऱ्याच्या किनारी माता शारदादेवीचे भव्य मंदिर उभारण्याचे कार्य चालू झाले आहे. ‘शारदा बचाव समिती’कडून हे मंदिर बांधण्यात येत आहे. या समितीच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. या मंदिराची उभारणी शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या तीर्थयात्रेला पुनरुज्जीवित करण्यासाठी केली जात आहे. ही यात्रा याआधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदापिठामध्ये होत असे. ज्या ठिकाणी आता मंदिर उभारण्यात येत आहे, तेथे पूर्वी शारदापिठाकडे जाण्यासाठी भाविक विश्रांती घेत असत.

(चित्रावर क्लिक करा)

समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता म्हणाले, ‘‘शारदा मंदिर जेथे उभारणार, तेथे पूजा करण्यात आली. यामध्ये देशातील विविध भागांतील काश्मिरी हिंदूही सहभागी झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये या मंदिराच्या योजनेची आधारशिला ठेवण्यात आली. मंदिराची संकल्पना आणि नमूना यांना दक्षिण श्रुंगेरी मठाकडून अनुमती मिळाली असून मंदिरात लागणाऱ्या ग्रेनाइटच्या दगडांवरील शिल्पकाम कर्नाटकच्या बिदादीमध्ये आरंभण्यात आले आहे. आम्ही अनकेदा केंद्र सरकारकडे आग्रह केला आहे की, पाकिस्तान सरकारशी संपर्क करून शारदापीठ महामार्ग (कॉरिडोर) बनवण्यात यावा. जर हा महामार्ग बनवला गेला, तर त्याला लाभ जम्मू-काश्मीरच नाही, तर पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांनाही होईल. येथे मोठ्या संख्येने भाविक तीर्थयात्रा करण्यासाठी येतील.’’