सद्यःस्थितीत मुलांनी सनातन हिंदु संस्कृती जाणून उत्तम शिक्षण घेणे आवश्यक ! – नागेंद्र भट, योग शिक्षक, गोकर्ण

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मादनगेरे, बळले (तालुका अंकोला) येथे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

दीप प्रज्वलन करतांना योग शिक्षक श्री. नागेंद्र भट आणि बाजूला समितीचे श्री. शरत कुमार

बळले (कर्नाटक) – आज शाळा, महाविद्यालयात योग्य संस्कारांच्या अभावामुळे अधिकाधिक मुले पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. हे रोखण्यासाठी आज आपण आपल्या घरात, शाळेत आणि महाविद्यालयात गुरु-शिष्य परंपरा अन् अध्यात्माचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत अनिवार्य झाले आहे. सद्यःस्थितीत मुलांनी सनातन हिंदु संस्कृती जाणून उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन योग शिक्षक श्री. नागेंद्र भट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंकोला तालुक्यातील मादनगेरे, बळले गावातील श्री अय्यप्पा स्वामी देवस्थानाच्या आवारात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरत कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेचे सूत्रसंचालन श्री. चंद्रशेखर मेस्ता यांनी केले. समितीचे श्री. शरत कुमार यांनी ‘हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हा एकमेव उपाय आहे’, असे सांगितले.