एका परिसरात मध्यंतरी एक घटना घडल्याविषयीचे वृत्त वाचनात आले. साधारणतः १० ते १२ वर्षांच्या काही मुलांनी एका लहान मुलाची वापरायची वस्तू तोडली. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर वस्तू तोडण्यापर्यंत गेले. या मुलांनी वस्तू तर तोडलीच; पण त्या लहान मुलाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यांच्या या बोलण्याचा त्या बालमनावर किती भीषण परिणाम झाला असेल, याचा विचारच आपण करू शकणार नाही. आज ती मुले बोलली, उद्या खरोखरच त्यांनी असे कृत्य केले, तर याला उत्तरदायी कोण ? ती मुले कि त्यांचे पालक ? हे केवळ एका ठिकाणचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आज सर्वत्र थोड्या फार फरकाने मुलांची अशीच स्थिती आहे. सध्याची मुले घडत आहेत कि बिघडत आहेत ? त्यांच्या तोंडी शिव्या का येतात ? ती गुन्हेगारीकडे जाण्यास प्रवृत्त का होतात ? याचा पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आज मुलांनी वस्तू तोडली, उद्या ती मोठी झाल्यावर कशी वागणार, याची निश्चिती कोण देणार ? मुलांना घडवणे, शिकवणे, त्यांच्यावर संस्कार करणे यांत बहुमोल वाटा पालकांचाच असतो. त्यामुळे मुले सुसंस्कारी झाली, तर त्याचे श्रेय पालकांचे आणि बिघडली तरी दोषही पालकांचाच ! आपली मुले काय करतात आणि ती कुणाच्या सान्निध्यात वाढत
आहेत ? आपल्या मुलांमुळे अन्य कुणाला त्रास किंवा मनस्ताप तर होत नाही ना ? याकडे पालकांनी लक्ष द्यावे. ‘सध्याची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे’, असे आपण म्हणतो; पण आज हीच मुले कुकृत्ये करण्यास धजावत असतील, तर देशाचे भविष्य उज्ज्वल कसे होणार ?
पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या तोंडी श्लोक किंवा पाढे असायचे; पण सध्याची मुले चित्रपटातील गाणी गुणगुणतात किंवा भ्रमणभाषमध्ये डोके खुपसून बसतात. अशी मुले बिघडणारच ! सध्या आई-वडील दोघेही नोकरीमध्ये व्यस्त असल्याने मुलांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही; पण तरीही मुलांशी सुसंवाद साधणे अत्यंत अत्यावश्यक आहे. सुसंस्कार, सुसंवाद, सुनियोजन या तिन्ही गोष्टी साध्य केल्यास मुले नक्कीच आदर्शत्वाकडे वाटचाल करतील. शेवटी एकच सांगावेसे वाटते, ‘आपल्याला वस्तू तोडणाऱ्या नव्हे, तर देशाचे भवितव्य घडवणाऱ्या हातांची आवश्यकता आहे आणि या हातांना बळ देणारे हात सक्षम अन् सजग पालकांचेच असायला हवेत !’
– एक वाचक