आम्ही पुजारी कुटुंबीय २१.७.२०२१ या दिवशी पनवेल येथील देवद आश्रमात वास्तव्यास आलो. आश्रमात आल्यानंतर केवळ ३ मासांत चि. वासुदेवमध्ये चांगले पालट जाणवले. ते येथे दिले आहेत.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
‘वर्ष २०१८ मध्ये चि. वासुदेव सिद्धेश पुजारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के पातळीचा’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची पातळी ५७ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहू लागणे
आश्रमात आल्यावर आरंभी वासुदेव पुष्कळ दंगा करत असे. आश्रमातील चैतन्य आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची कृपा यांमुळे हळूहळू त्याच्यात चांगले पालट होऊ लागले. आता तो आश्रमात सगळ्यांशी बोलतो आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून रहातो.
२. पूर्वी त्याला ‘नमस्कार कर’, असे सांगूनही तो कुणालाही नमस्कार करत नसे; पण आता तो स्वतःहून सर्वांना नमस्कार करतो.
३. नामजप करणे
एक दिवस त्याची मोठी बहीण कु. वर्षा (वय ६ वर्षे ९ मास, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के) ही घराच्या पायर्या झाडत होती. तेव्हा वासुदेव मध्येमध्ये लुडबुड करत होता. त्यामुळे वर्षा त्याला म्हणाली, ‘‘वासुदेव, मी सेवा करत आहे. तू एका ठिकाणी बसून नामजप कर.’’ त्याने लगेच तिचे ऐकले आणि तो एका ठिकाणी बसून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप मोठ्याने करू लागला. शेजारी रहाणार्या काकूंनी त्याचे कौतुक करून म्हटले, ‘‘तुझा आवाज किती छान आहे !’’
४. आश्रमात जाऊन आरती म्हणण्याचा प्रयत्न करणे
मी त्याला १ – २ वेळा संध्याकाळच्या आरतीसाठी ध्यानमंदिरात घेऊन गेले होते. तेव्हा तो शांतपणे हात जोडून आरतीला उभा राहिला. आता तो एकटाच आरतीला जातो आणि आरती म्हणण्याचा प्रयत्न करतो.
५. प्रार्थना करणे
तो रात्री झोपतांना मी सांगितलेली प्रार्थना करतो आणि मगच झोपतो. सकाळी अंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करतो आणि ‘आई, प्रार्थना सांग’, असे म्हणतो.
६. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे
तो रात्री झोपण्यापूर्वी उदबत्ती घेऊन देवाला ओवाळतो. पूर्ण खोलीत उदबत्तीचा धूर दाखवतो. नंतर कापराची पूड करून अंथरुणावर घालतो.
७. आईला साधनेत साहाय्य करणे
७ अ. आईला जेवणापूर्वी प्रार्थना करण्याची आठवण करणे : एक दिवस वासुदेवला बरे नव्हते; म्हणून त्याच्या बाबांनी आश्रमातून जेवणाचा डबा आणला होता. आम्ही जेवायला बसल्यावर मी प्रार्थना न करताच घास घेत होते. तेवढ्यातच त्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला, ‘‘तू प्रार्थना केलीस का ? आधी प्रार्थना कर. नंतर जेव.’’
७ आ. आईला कृष्णार्जुनाच्या चित्राला ओवाळण्यास सांगणे : एक दिवस मी उदबत्ती लावून देवांना ओवाळले; परंतु दुसर्या खोलीतील श्रीकृष्णार्जुनाच्या चित्राला ओवाळले नाही. ते बघून तो म्हणाला, ‘‘तू श्रीकृष्णाला का ओवाळले नाहीस ? विसरलीस का ?’’
८. आश्रमाची ओढ असणे
अ. वासुदेवला घरी रहाण्याचा कंटाळा येतो. सकाळी उठल्यापासूनच तो ‘आश्रमात जाऊया’, असे म्हणतो. तो मला म्हणतो, ‘तू सेवा कर आणि मी नामजप करतो. माझा नामजप झाल्यावर मीसुद्धा सेवा करतो. मी मोठा झाल्यावर पुष्कळ सेवा करणार आहे.’
आ. एके दिवशी तो त्याच्या मोठ्या बहिणीला, वर्षाला सांगत होता, ‘‘अक्का, आपल्या गावात आश्रम नाही; म्हणून आपण आता कधी गावाला जायचे नाही. इथे आश्रम आहे, तर आपण इथेच राहूया.’’
इ. एकदा वासुदेव ताप, खोकला आणि सर्दी झाल्यामुळे ४ – ५ दिवस रुग्णाईत होता, तरीही तो सारखा ‘आश्रमात चल’, असे म्हणत होता.
ई. एक दिवस माझ्या एका बहिणीचा भ्रमणभाष आला होता. तेव्हा तो तिला सांगत होता ‘‘तुम्ही बरे आहात ना ? आम्ही आश्रमात आलो आहोत. आता आम्ही इथेच राहून सेवा करणार आहोत. आता आम्ही गावाला येणार नाही.’’
९. वासुदेवने त्याच्या मावशीच्या यजमानांना व्यसन सोडून सेवा आणि नामजप करावयास सांगणे
एकदा माझ्या मोठ्या बहिणीचा भ्रमणभाष आला होता. तिच्या यजमानांना मद्य पिण्याचे आणि बिडी ओढण्याचे व्यसन आहे, हे वासुदेवने पाहिले होते. त्यामुळे त्यांचा दूरभाष आल्यावर वासुदेव आणि माझे भावोजी (वासुदेवच्या मावशीचे यजमान) यांच्यात पुढील संभाषण झाले.
चि. वासुदेव : तुम्ही मद्य प्यायचे सोडले का ?
मावशीचे यजमान : हो हो, सोडले.
चि. वासुदेव : आणि बिडी ?
मावशीचे यजमान : ती पण सोडू का ? सोडतो सोडतो बाबा.
वासुदेव : तुम्ही एकदा तरी आश्रमात या सेवा करायला. माझे बाबा आश्रमात सेवा करतात.
मावशीचे यजमान : तुम्ही तिकडे आश्रमात जाऊन सेवा करायला शिकलात; पण आम्हाला काही येत नाही.
वासुदेव : तुम्ही एकदा आश्रमात या. मग माझे बाबा तुम्हाला सेवा करायला शिकवतील.
वासुदेव : आम्ही आश्रमात नामजप करतो. तुम्ही नामजप करता का ?
मावशीचे यजमान : आम्हाला काही नामजप कसा करायचा, हे ठाऊक नाही.
वासुदेव : ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप करायचा.
१०. आश्रमात रहायला आल्यानंतर रुग्णाईत असतांना आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांनी लवकर बरे वाटणे
गावी असतांना तो रुग्णाईत असायचा, तेव्हा आधुनिक वैद्यांची ओषधे देऊनही १० – १५ दिवस झोपून असायचा. पुष्कळ वेळा त्याला रुग्णालयात भरती करावे लागत असे. कधी कधी तर त्याची स्थिती अत्यंत गंभीर व्हायची; पण आश्रमात आल्यापासून तो रुग्णाईत झाला, तरी त्याला कधीही ‘इंजेक्शन’ द्यावे लागले नाही. केवळ आधुनिक वैद्यांनी दिलेल्या औषधांनीच त्याला लवकर बरे वाटते.
११. चुकांविषयी गांभीर्य असणे
त्याने कधी वर्षाची खोडी काढल्यावर किंवा दंगा केल्यावर त्याला ‘तू असे का केलेस ?’, असे विचारले, तर तो लगेच म्हणतो, ‘‘माझी चूक झाली. मी पुन्हा असे कधी करणार नाही.’’
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
१२. स्वभावदोष
हट्टीपणा आणि आवड-नावड असणे
वासुदेवच्या शारीरिक स्थितीत आणि स्वभावात झालेले हे सर्व चांगले पालट आश्रमातील चैतन्य आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेचेच फळ आहे.
‘प.पू. डॉक्टर, आपणच आम्हाला प्रसादरूपाने वासुदेव आणि वर्षा यांच्यासारखी २ अनमोल रत्ने दिली आहेत. यासाठी आम्ही आपल्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– श्री. सिद्धेश पुजारी (चि. वासुदेवचे वडील, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि सौ. लक्ष्मी पुजारी (चि. वासुदेवची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१०.२१)