युक्रेनने रशियन सैन्यावर केली ‘शक्तीशाली आक्रमणे’ ! – युक्रेन

कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चालू होऊन एक मास उलटून गेला आहे. एकीकडे रशियाकडून युक्रेनवर वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला जात आहे, तिथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी मात्र ‘युक्रेनने रशियन सैन्यावर शक्तीशाली आक्रमणे करून त्याची मोठ्या प्रमाणात हानी केली’, असा दावा केला आहे.

युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत. कीवपासून ३५ किमी अंतरावर असलेली ही ३ शहरे मागील पंधरवड्यापासून रशियाच्या कह्यात होती.

दिवसभरात घडलेल्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडी

युक्रेनच्या विरोधातील युद्धाचा पहिला भाग पूर्ण झाला असून आता रशियन सैन्य डोनबास प्रांताच्या पूर्वी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणार आहे, असे रशियन सैन्याने घोषित केले आहे.

रशियन सैन्याच्या या घोषणेवर पाश्‍चात्त्य देशांच्या सैन्यदलांनी ‘रशियाची युद्धापूर्वीची धोरणे अपयशी ठरली आहेत’, असा अंदाज व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे त्यांचा युरोपीय दौरा समाप्त करतांना युक्रेनचा शेजारी देश पोलंड येथे पोचले आहेत. त्यांनी तेथील युक्रेनी शरणार्थींच्या एका गटाला संबोधित केले.

‘जर रशियाने युद्धामध्ये जैविक अथवा रासायनिक शस्त्रांचा वापर केला, तर अमेरिका स्वत: युद्धात उतरील’, असे बायडेन यांनी याआधी स्पष्ट केले होते.

गेल्या आठवड्यात रशियाने मरियुपोल या दक्षिण युक्रेनमधील समुद्राला लागून असलेल्या शहरातील एका चित्रपटगृहावर केलेल्या बाँबवर्षावामध्ये ३०० लोक मारले गेले, असे युक्रेनच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

युक्रेनी अधिकार्‍यांनी दावा केला आहे की, रशियाचे संरक्षणमंत्री सर्गे शॉयगू यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला.