रुग्णाईत असतांनाही सतत अनुसंधानात राहिल्याने आनंदी असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले नाशिक येथील पू. महेंद्र क्षत्रीय (वय ६९ वर्षे) !

संत घडवणारी आणि या संतांच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारी सनातन संस्था

फाल्गुन कृष्ण पक्ष अष्टमी (२५.३.२०२२) या दिवशी नाशिक येथील सनातनचे ४३ वे संत पू. महेंद्र क्षत्रीय यांचा ६९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी कु. सिद्धी क्षत्रीय यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. महेंद्र क्षत्रीय यांना ६९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. अतीदक्षता विभागात असतांनाही सतत अनुसंधानात असल्यामुळे तोंडवळा तेजस्वी दिसणे आणि नातेवाइकांनाही तसे जाणवणे

पू. बाबा कोरोना महामारीच्या काळात रुग्णाईत होते. ते रुग्णालयातील अतीदक्षता विभागात असतांनाही सतत अनुसंधानात असल्याने नेहमी आनंदी आणि प्रसन्न असायचे. त्यामुळे त्यांचा तोंडवळा तेजस्वी वाटत असे. आमचे एक नातेवाईक पू. बाबांशी ‘व्हिडिओ कॉल’वर बोलले. तेव्हा ते नातेवाईक मला म्हणाले, ‘‘बाबांकडे पाहून ते अतीदक्षता विभागात आहेत’, असे मला वाटत नाही. ते फार प्रसन्न दिसतात.’’

२. रुग्णालयात त्यांच्या शेजारचे रुग्ण सतत रडत आणि ओरडत असायचे. त्या वेळी पू. बाबा त्या सर्वांना नामजप सांगून ‘तुम्ही नामजप करा, म्हणजे तुम्हाला काही होणार नाही’, असे सांगायचे.

कु. सिद्धी क्षत्रीय

३. प्रेमभाव

३ अ. पू. बाबांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेल्यावर त्यांची प्रकृती अत्यवस्थ असूनही ते आम्हाला विचारत, ‘‘तुम्ही जेवलात का ? तुम्ही ठीक आहात ना ?’’ ते साधकांचीही प्रेमाने विचारपूस करायचे.

३ आ. मुलीने वेगळा पदार्थ बनवल्यावर तिचे कौतुक करणे : एकदा मी पू. बाबांसाठी वेगळा पदार्थ बनवला होता. त्या वेळी ते कौतुकाने म्हणाले, ‘‘पदार्थ फार छान झाला आहे.’’ काही वेळाने ते मला म्हणाले, ‘‘माझ्यासाठी प्रतिदिनचे जेवण काय आणि हे काय ? दोन्ही सारखेच आहे. कौतुक करतो, ते तुमच्यासाठी ! मुख्य म्हणजे आपले सर्व लक्ष देवाकडे असायला हवे.’’

४. पू. बाबांच्या वागण्याचा रुग्णालयातील वैद्य, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम !

४ अ. पू. बाबांचे बोलणे ऐकून आधुनिक वैद्यांच्या मनावरील ताण न्यून होणे : तपासणीसाठी आलेले आधुनिक वैद्य पू. बाबांना विचारायचे, ‘‘काका, कसे वाटते ?’’ त्या वेळी पू. बाबा म्हणायचे, ‘‘आनंद ! आनंद !’’ त्यामुळे आधुनिक वैद्यांच्या मनावरील दडपण न्यून होऊन त्यांनाही चांगले वाटायचे. स्वतःची प्रकृती अत्यवस्थ असूनही आधुनिक वैद्य तपासणीसाठी आल्यावर पू. बाबा त्यांना नमस्कार करून विचारत, ‘‘कसं काय आहे ? बरे आहे ना ?’’ त्यामुळे बाबांशी बोलल्यावर आधुनिक वैद्य त्यांच्या कामाचे दडपण विसरून जायचे.

४ आ. ‘वॉर्डबॉय’ने पू. बाबांना रागावून आणि जोरात ‘मास्क’ लावल्यावरही पू. बाबांनी त्याला हात जोडून नमस्कार करणे अन् त्यामुळे ‘वॉर्डबॉय’ला स्वतःच्या चुकीची जाणीव होणे : रुग्णालयातील ‘वॉर्डबॉय’ पू. बाबांवर चिडचिड करायचे, ओरडायचे, तसेच ते त्यांची कामे नीट करत नसत; परंतु त्यांच्या वागण्याचा पू. बाबांवर काहीच परिणाम होत नसे. एकदा पू. बाबांना औषध देण्यासाठी मी त्यांचा ‘मास्क’ काढला आणि तो पुन्हा लावण्यासाठी मी ‘वॉर्डबॉय’ला बोलावले. त्या वेळी त्याने पू. बाबांना रागारागाने आणि जोरात ‘मास्क’ लावला. ‘मास्क’ लावून झाल्यावर पू. बाबांनी स्मित हास्य करत ‘वॉर्डबॉय’ला हात जोडून नमस्कार केला. त्या वेळी त्याला स्वतःच्या अयोग्य वागण्याची जाणीव झाली आणि त्यानंतर त्याने पू. बाबांवर चिडचिड केली नाही.

४ इ. पू. बाबांचे वागणे आणि स्वभाव यांतील वेगळेपणा रुग्णालयातील वैद्य, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांच्या लक्षात येणे अन् त्यांची पू. बाबांशी जवळीक होणे : पू. बाबांचे वागणे आणि स्वभाव यांतील वेगळेपण तेथील आधुनिक वैद्य, परिचारिका अन् अन्य कर्मचारी यांच्याही लक्षात येऊ लागले. ते मला म्हणत, ‘‘हे काका इतरांपेक्षा वेगळे आहेत. पूर्ण रुग्णालयात हे एकटेच असे आहेत की, जे नेहमी हसत असतात. त्यांना पाहून आम्हाला बरे वाटते.’’ तेथील एक परिचारिका कितीही व्यस्त असली, तरी ती पू. बाबांना दारातून ‘जाते’, असे सांगूनच घरी जायची.

४ ई. पू. बाबा रुग्णालयातून घरी जायला निघतांना तेथील कर्मचारी त्यांना निरोप द्यायला येणे : पू. बाबांच्या आनंदी स्वभावामुळे ते रुग्णालयातील सर्वांचे आवडते झाले होते. आम्ही त्यांना रुग्णालयातून घरी नेत असतांना तेथील कर्मचारी त्यांना गाडीपर्यंत निरोप द्यायला आले. आम्ही तेथून निघतांना पू. बाबांनी त्या सर्वांना हात जोडून नमस्कार केला.

५. भाव

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

१. पू. बाबा रुग्णालयात असतांना त्यांच्या उशीजवळ ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे पाहून सतत भावपूर्ण नमस्कार करत.

२. मी त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांनी पाठवलेला प्रसाद देत असे. तेव्हा ते हात जोडून मला म्हणत, ‘‘मी काय करतो की, ज्यामुळे ते मला प्रसाद पाठवतात ?’’ त्या वेळी त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येत असे.

५ आ. देवाप्रती भाव

५ आ १. मी पू. बाबांना भेटण्यासाठी प्रतिदिन रुग्णालयात जायचे. तेव्हा त्यांना विचारायचे, ‘‘बाबा, कसे वाटते ? काही त्रास होतो का ?’’ त्या वेळी ते हसून हाताने खुणवायचे, ‘‘मी आणि ईश्वर ! अन्य काही नको. आले का लक्षात ?’’

५ आ २. पू. बाबांना आंबा न खाण्याचे पथ्य असतांना मुलीने त्यांना आंबा खायला सांगितल्यावर त्यांनी ‘देव आपल्याकडे सतत पहात आहे’, असे सांगून आंबा न खाणे : वैद्यांनी पू. बाबांना काही कालावधीसाठी आंबा न खाण्याचे पथ्य सांगितले होते. एकदा मी आंबा खात असतांना पू. बाबांना म्हणाले, ‘‘बाबा, आजच्या दिवस तुम्ही आंबा खा. वैद्य तुम्हाला काही म्हणणार नाहीत. मी वैद्यांना सांगते.’’ त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘नाही, नाही. देव बघतोय ना !’’ ‘वैद्यांनी पथ्य सांगितले नसून देवानेच ते सांगितले आहे’, असा त्यांचा भाव होता. यातून ‘त्यांची बांधिलकी कुणा व्यक्तीशी नसून देवाशीच आहे’, असे माझ्या लक्षात आले.

‘हे ईश्वरा, ‘आपल्याच कृपेने मला संतांकडून शिकण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. सिद्धी महेंद्र क्षत्रीय (मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.३.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक