मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – नागपूर येथील कर्करोग निदान केंद्रासाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाचे बांधकाम करण्यासाठी निधीचा प्रश्न येणार नाही आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राज्यामधे प्रति १०० किलोमीटर अंतरावर कर्करोग उपचारांसाठी उपकेंद्र चालू केले जातील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत घोषित केले. आमदार समीर मेघे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह इतर आमदारांनी हा प्रश्न विचारला होता.
नागपूर येथील कर्करोग उपचार (कॅन्सर) केंद्रासाठी गेल्या सरकारच्या काळात तातडीने निधी उपलब्ध केला गेला होता; पण तो निधी हाफकिन महामंडळाला समर्पित केला गेला. नागपूर येथे कर्करोगाच्या रुग्णांचे हाल चालूच आहेत, याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. ‘नागपूर येथे सध्या अस्तित्वात असलेल्या कोबाल्ट उपचार केंद्राचेच रूपांतर कर्करोगाच्या उपचारांसाठीच्या रेडिओथेरपीमध्ये करण्यासाठी हा पैसा वापरणे शक्य होते’, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री देशमुख यांनी ‘हाफकिन महामंडळाकडून वर्ग झालेले पैसे पुन्हा घेऊन जुन्या जागेत रुग्णालयाचे बांधकाम करून यंत्रणा बसवण्यात येईल’, असे घोषित केले.