नगर जिल्ह्यातील तळे, विहीर आणि शिंदे गावांत जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात पाणीपुरवठा करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

डावीकडून गुलाबराव पाटील आणि डॉ. किरण लहामटे

मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नगर जिल्ह्यातील तळे, विहीर आणि शिंदे गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना करण्यात आली आहे. योजनेच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून ५ कोटी रुपये व्यय करू शकतो. तसे अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याचे दायित्व घेतो, असे आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिले. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ही लक्षवेधी मांडली होती.

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले की, गेल्या १०-१२ वर्षांपासून तळे, विहीर आणि शिंदे गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची योजना संमत करण्यात आली आहे; मात्र कामाचा दर्जा चांगला नसल्याने वरील गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही. सिद्ध करण्यात आलेल्या विहिरीमध्येही केवळ २-३ मास पुरेल इतकेच पाणी आहे. पिण्याची पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गावकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ‘याविषयी काम न करणारे ठेकेदार आणि दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करून तातडीने गावांना पाणीपुरवठा करावा’, अशी मागणी केली.